प्रवीण देसाई
कोल्हापूर : थेट तहसीलदारच लाचप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने संपूर्ण महसूल विभागाचीच प्रतिमा डागाळली आहे. गेल्या दोन महिन्यांंतील हा दुसरा प्रकार आहे. या विभागात आलेली शिथिलता, वरिष्ठांचा न राहिलेला धाक आणि ‘माझं कोण काय बिघडवतंय?’ या अतिआत्मविश्वासमुळेच लाच घेण्यासाठी हात निर्ढावल्याचे दिसत आहे.कागलचे तहसीलदार किशोर घाडगे यांच्यासह दोघे कर्मचारी अडीच लाखांच्या लाचप्रकरणी गुरुवारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. यामुळे खळबळ माजली आहे. एरवी अशा प्रकरणात छोटे मासे म्हणून कर्मचारीच समोर यायचे; पण कागलच्या प्रकरणात थेट तहसीलदारांच्या रूपानेच मोठा मासा अडकल्याने महसूल खात्याची प्रतिमा किती खालावली आहे, हे सिद्ध होते. या प्रकरणात सापडलेले तहसीलदार हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे.ज्यांना चांगला पगार आहे, समाजात चांगला मान आणि प्रतिष्ठा आहे, त्यांच्याकडून अशा पद्धतीने स्वत:सह संपूर्ण खात्याची प्रतिमा धुळीस मिळवायचे प्रकार होणे ही शरमेची बाब आहे. एम.पी.एस.सी.सारखी खडतर परीक्षा ही जीव तोडून मेहनत करून व रात्रंदिवस अभ्यास करून उत्तीर्ण होऊन या पदावर यायचे, ते यासाठीच का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही.आपण तालुक्याचे जणू सर्वेसर्वाच आहोत; माझे कोण काय बिघडविणार, याच आत्मघातकी मानसिकतेतून लाच घेण्यासारखा निर्ढावलेपणा आल्याचे दिसत आहे. यावरून खात्यावर वरिष्ठांचाही धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे.गेल्या दोन महिन्यांपूर्र्वीही जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला बंदुकीच्या परवान्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. यामुळे संपूर्ण महसूल वर्तुळात खळबळ माजली होती. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. असे प्रकार होऊ नयेत हाच त्यामागील उद्देश होता; परंतु यामुळे काहीच फरक पडला नसल्याचे कागलच्या प्रकरणावरून दिसत नाही.
महसूलमंत्र्यांनी दिला होता इशारामहाराष्ट राज्य तलाठी संघाचे २४ डिसेंबर २०१७ रोजी कोल्हापुरात अधिवेशन झाले. यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा तलाठ्यांसह महसूल अधिकाऱ्यांना दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेच्या बाबतीत टोकाचे आग्रही आहेत. गेल्या वर्षभरात जिल्'ात २०, तर राज्यात ३०० हून अधिक तलाठी लाचखोरीत निलंबित झाले आहेत. त्यामुळे अंतर्मुख व्हा, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला होता; परंतु त्यांचा इशाराही धाब्यावर बसविण्याचा प्रकार या निमित्ताने झाल्याची चर्चा आहे.
महसूल कर्मचारी संघटना करणार प्रबोधनलाच प्रकरणामुळे संपूर्ण खात्याची बदनामी होत आहे. यासाठी महसूल कर्मचारी संघटनेतर्फे यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्हाभर दौरे काढून कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्याविषयी मागणी केली होती. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसली तरी पुन्हा अशी मागणी केली जाणार आहे. तलाठ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगले पगार असताना असे प्रकार करून खात्याची बदनामी करू नका, असे प्रबोधन केले जाणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.