कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने सर्वसाधारण सभेत व्यक्ती सभासदांना निवडणुकीसाठी १५ हजार रकमेची शेअर्स धारणा व पाच वर्षांत सव्वा लाख, तर संस्था सभासदांना पाच लाखांची खरेदी करणे, ही उपविधी दुरुस्ती जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळली. उपविधी दुरुस्तीचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले होते, पण आवाजी मताने ठराव मंजूर करत मंजुरीसाठी निबंधक कार्यालयाकडे पाठविला होता.संघाच्या सत्तारूढ गटाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपविधी दुरुस्तीचा घाट घातला होता. पूर्वी संघाच्या दर्शनी किमतीचा शेअर्सधारक असणाऱ्या व्यक्तीस निवडणुकीला उभे राहता येत होते; पण संचालक मंडळाने शेअर्स धारण रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेत व्यक्ती सभासदांना निवडणूक लढविण्यासाठी २५ हजार रुपये रकमेची शेअर्स, वर्षाला २५ हजारांची खरेदी, तर संस्था सभासदांना वर्षाला १ लाखाची खरेदी करणे, अशी दुरुस्ती सूचविली होती.याविरोधात संचालक मंडळातच दोन गट पडले होते. काही ज्येष्ठ संचालकांनी त्याला विरोध केल्याने सभेच्या अगोदर दीड-दोन तास २५ हजारांऐवजी १५ हजार रकमेचे शेअर्स धारण निश्चित करण्यात आले. संघाच्या २८ आॅगस्ट रोजी झालेल्या ७८ व्या सर्वसाधारण सभेत उपविधी दुरुस्ती ठेवण्यात आली, त्याला संघाचे माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते यांनी विरोध केला; पण सत्तारूढ गटाने आवाजी मताने ठराव मंजूर करून, तो अंतिम मान्यतेसाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे पाठविला.त्यावर संघाचे माजी संचालक सुरेश देसाई (म्हसवे, ता. भुदरगड) व संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे हरकत घेतली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. यामध्ये संघ संचालकांचा उपविधी दुरुस्तीचा उद्देश व्यापक व सभासद हिताचा नसल्याने ती फेटाळण्यात आली.
जिल्हा उपनिबंधकांनी काही त्रुटी काढल्या आहेत, याबाबत संचालक मंडळाच्या सभेत चर्चा करून, पुढील निर्णय घेतला जाईल.- अमरसिंह माने,अध्यक्ष, शेतकरी संघ
सामान्य सभासदाला निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब ठेवणाºया झुंडशाहीविरोधात दिलेल्या लढ्याला यश मिळाले. संघातील अपप्रवृत्तीविरोधातील लढाई थांबलेली नाही, यापुढेही बेकायदेशीररीत्या रद्द केलेले सभासद व व्यवहाराबाबत दाद मागू.- सुरेश देसाई, माजी संचालक, शेतकरी संघ
यासाठी उपविधी फेटाळली
- संचालक मंडळ सभेत २५ हजार शेअर्स मर्यादा व सर्वसाधारण सभेत १५ हजार शेअर्स मर्यादेची शिफारस. दोन्ही ठरावात तांत्रिक विसंगती.
- दुरुस्ती प्रस्ताव विहित नमुन्यात नाही.
- उपविधी दुरुस्ती मसुदा सभासदांच्या माहितीसाठी दिलेली नाही.
- कलम २३ प्रमाणे सभासदत्व खुले असल्याने निव्वळ निवडणुकीसाठी भाग धारणा मर्यादा व माल खरेदीची अट घालता येणार नाही.
- या दुरुस्तीने जुन्या सभासदांच्या हक्कावर गदा येणार आहे.
- राखीव गटातील सभासदांचा भाग धारण मर्यादा वाढवून त्यांचा हक्क डावलता येणार नाही.