कोल्हापूर : शहराच्या निम्म्याहून अधिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मस शुक्रवारी पुन्हा एकदा बिघडल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली. गेल्याच आठवड्यात एकाच रात्री तीनवेळा वीज पुरवठा खंडित झाला, तर ट्रॉन्स्फॉर्मर जळाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री असा प्रकार घडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आठ दिवसांपूर्वी झाडांच्या फांद्यांचा विद्युत तारांना स्पर्श होत राहिल्याने एकाच रात्रीत तीनवेळा वीज पुरवठा बंद झाला. ट्रॉन्स्फॉर्मर जळाला. त्याची दुरुस्ती करून घेण्यात आली; त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होतो न होतो तोच पुन्हा गुरुवारी रात्री बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मर जळाला; त्यामुळे पाणी उपसा तसेच पुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर रात्रीतच त्याठिकाणी दुसरा ट्रॉन्फॉर्मर बसविला.शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पंपिंग व्यवस्थीत सुरू राहील; मात्र त्यानंतर पुन्हा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाला. तो दुरुस्त करण्याकरिता एम. एस. सी. बी.च्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्त केला. ट्रॉन्स्फॉर्मर बदलणे, दुरुस्त करणे यात बराच वेळ गेल्याने शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले. दुपारनंतर मात्र नियमित जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाले.बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी चंबुखडी पाण्याची टाकी येथे आणले जाते. त्यानंतर या टाकीतून शहरातील संपूर्ण सी व डी वॉर्ड तसेच लक्षतीर्थ, फुलेवाडी रिंगरोड, आपटेनगर, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी कॉलनी या उपनगर भागाला पाणी पुरवठा केला जातो. या भागात शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा झाला नाही. दुपारनंतर मात्र पाणी पुरवठा सुरू झाला.दरम्यान, एकाच आठवड्यात दोनवेळा बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा विभागाने बालिंगा केंद्रातील ट्रॉन्स्फॉर्मर, मोटर, वायरिंग, पॅनेल बोर्ड, पंप, आदी यंत्रे नवीन बसविण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला असून अधिकाऱ्यांना त्याबाबत एस्टिमेट करायला सांगितली आहेत, असे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.