प्रवीण देसाई
कोल्हापूर : राज्यभरात एकाच वेळी धान्यवाटप सुरू असल्याने पॉस मशीनवर ताण पडून त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दहा-दहा रेशनकार्डधारकांचे गट तयार करून, त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन धान्य वाटप करावे; सायंकाळी उशिरापर्यंत हे वाटप सुरू ठेवावे, अशा स्वरूपाचे फर्मान राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून असे संदेश सर्व दुकानदारांना पाठविले आहेत.
त्यामुळे दुकानदारांची दोन्ही बाजूंनी गोची झाली आहे. ग्राहकांना तोंड देताना त्यांना नाकी नऊ येत आहे. मशीनच्या तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्याऐवजी हा अजब मार्ग त्रासदायक होत असल्याच्या भावना दुकानदारांमधून व्यक्त होत आहेत.दिवाळीच्या आदल्या दिवशीपासून ई-पॉस बंद राहिल्याने अर्धा दिवस ग्राहकांची ससेहोलपट झाली. सर्व्हर डाउनमुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले; परंतु दिवाळी दिवशीही या मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सर्व्हर संथगतीने सुरू असल्याने दिवाळीदिवशीही रेशन दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाने रेशन दुकानदारांसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयांना व्हॉट्स अॅपवरून संदेश पाठविले आहेत. यामध्ये पॉस मशीनद्वारे एकाच वेळी राज्यभरात धान्याचे वाटप सुरू केल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे अशा परिस्थितीत दुकानांसमोरील गर्दीचे नियोजन करावे लागेल. दहा-दहा कार्डधारकांचे गट करून त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन सायंकाळी उशिरापर्यंत धान्याचे वितरण करावे; तसेच काही अडचणी असल्यास ‘१८००८३३३९००’ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे कळविले आहे.एका बाजूला संतप्त ग्राहक, तर दुसऱ्या बाजूला शासनाचे अजब फर्मान अशा दुहेरी मन:स्थितीत दुकानदार आहेत. तांत्रिक अडचणींविषयी दुकानदारांनी शासकीय पातळीवर विचारणा केल्यावर सर्व्हर डाऊन असल्याचे उत्तर देऊन आपली सुटका करून घेण्याचे काम होत आहे; परंतु ग्राहकांच्या रोषाला दुकानदारांनाच सामोरे जावे लागत आहे. शासनाने सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींची लवकर सोडवणूक करावी, असा सूर दुकानदारांसह ग्राहकांमधूनही उमटत आहे.
ई-पॉस मशीनचे व्यवहार संथगतीने सुरू आहेत. हा राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे. तांत्रिक बाबतीत जागरूकता दिसत नाही. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी तातडीने या विषयात लक्ष घालून तो निकाली काढावा.-चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती