भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात ५ हजार ४६२ मोजणीची प्रकरणे भूमी अभिलेख विभागाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. कोरोनाचे सावट, मनुष्यबळाची कमतरता, ड्रोनव्दारे चाललेल्या सर्व्हेच्या कामांमुळे अति तातडीची मोजणीही वेळेत करता येत नाही, असा प्रशासनाचा दावा आहे.परिणामी पै पै जमा करून खरेदी केलेली जमीन, प्लॉट, शेती, घरांचे क्षेत्रफळ मोजणीचे काम करण्यासाठी हजारो रुपये भरूनही सहा, सहा महिने वेटिंग करावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी हद्दीवरूनची भांडणे होत आहेत.तालुकानिहाय असलेल्या भूमी अभिलेख प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या कार्यालयांकडे दाखलपैकी किती प्रकरणे निर्गत झाली, याचा आढावा दर महिन्याला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखांकडून घेतला जातो. शेतीच्या मोजणीचे काम उन्हाळ्यातच प्राधान्याने करावे लागते. पावसाळ्यात हे काम करता येत नाही.शिवाय सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट सतावत आहे. दाखल प्रकरणाच्या तुलनेत मनुष्यबळाचीही कमतरता भासत आहे. यामुळे मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठी आहे. या सर्व प्रकरणांचा निपटारा करावा, अशी मागणी होत आहे.
वर्षभरात ९ हजार प्रकरणे, ५ हजार प्रलंबित
वर्षभरात सरासरी ९ हजारांवर मोजणीची प्रकरणे दाखल होतात. त्यापैकी निम्यांपेक्षा अधिक प्रकरणांची मोजणी वेळेत करणे प्रशासनाला शक्य होत नाही. यामुळे हद्द निश्चित करण्याची गरज असलेले शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार हेलपाटे मारताना दिसतात.
सहा सहा महिने वेटिंग कशासाठी?अति तातडीच्या मोजणीलाही दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. इतर प्रकारच्या मोजणीला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबावे लागते. वेळेत मोजणी केली जात नाही. - विनायक कांबळे, शेतकरी
साध्या मोजणीसाठी अनेक वर्षे वेटिंगवर राहावे लागते. म्हणून तातडीच्या मोजणीसाठी जादा पैसे भरून घेतले जातात. तरीही वेळेत मोजणी केली जात नाही. - बाळू ऐवाळे, शेतकरी
जमीन मोजणीचे प्रकार - शुल्कसाधारण : १०००तातडीची : २०००अति तातडीची : ३०००अति अति तातडीची : १२ हजार