कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. उद्या, बुधवारी जिल्ह्यातील ४० मतदान केंद्रांवर मतदान होत असून, शुक्रवारी (दि. ७) शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी होणार आहे.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी सत्तारूढ छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी व विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीमध्ये लढत होत आहे. गेली सहा महिने बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रमुख नेतेमंडळींनी प्रयत्न सुरू ठेवले होते. शेवटच्या टप्प्यापर्यंत चर्चाही कायम राहिली.
मात्र, शिवसेनेच्या तिसऱ्या जागेची मागणी आणि बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांना आमदार विनय कोरे यांनी केलेल्या विरोधामुळे अनपेक्षितपणे विरोधी पॅनलची मोट बांधली गेली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी व खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी रिंगणात उतरली आहे.
गेले पंधरा दिवस तालुका पातळीवरील जाहीर सभेने जिल्ह्याचे राजकारण अक्षरश: ढवळून निघाले आहे. विरोधी आघाडीकडून टीकेची झोड उठवली गेली. साखर कारखान्यांना कर्ज वाटप करीत असताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप विरोधी आघाडीने केला आहे, तर राजकारणाची पादत्राणे बाहेर काढून बँकेचा कारभार केल्याचा दावा सत्तारूढ गटाने केला आहे. ‘आदानी-अंबानी’पर्यंत टीकेची पातळी पोहोचली होती. अखेर सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबला आहे. उद्या, बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत जिल्ह्यातील ४० केंद्रांवर मतदान होत आहे.
‘जोडण्यासाठी यंत्रणा सरसावल्या
मतदानासाठी एकच दिवस राहिल्याने प्रत्येक उमेदवाराने आपली यंत्रणा अधिक गतिमान केली आहे. शेवटच्या टप्प्यात थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोडण्या लावल्या जात आहेत.