कोल्हापूर : जिल्हा बॅँक व न्यूट्रियंट्स फ्रुट्स प्रा. लि. कंपनी, गोकाक यांच्यात झालेला दौलत साखर कारखान्यामधील करार रद्द करण्याचा ठराव अखेर शुक्रवारी मंजूर करण्यात आला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ‘न्यूट्रियंट्स’ने पैसे न भरल्याने बॅँकेने कारवाई केली असून, १९ डिसेंबरपर्यंत ताबा घेणार असल्याची नोटीस बॅँकेने कंपनीला लागू केली आहे.
‘दौलत’ साखर कारखाना ४५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर जिल्हा बॅँकेने ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीला दिला होता. बॅँक व कंपनी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार पहिला हप्ता कंपनीने भरला; पण मार्च २०१८ मध्ये सुमारे आठ कोटींचा दुसरा हप्ता कंपनीने थकविल्याने बॅँकेने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पैसे भरण्यासाठी कंपनीला मुदत दिली; पण त्या वेळेतही कंपनीने वेळेत पैसे न भरल्याने बॅँकेने पुढील कार्यवाहीस सुरुवात केली. त्यानुसार शुक्रवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीशी झालेला करार रद्द करण्याचा ठराव करण्यात आला.
आता जिल्हा बॅँक कारखान्याचा ताबा घेणार आहे. त्यासाठी बॅँकेने १९ डिसेंबरपर्यंत मुदतीची नोटीस कंपनीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याभरात बॅँक ताबा घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी द्यायचा की त्याची विक्री करायची, हा निर्णय घेणार आहे. ‘दौलत’ भाडेतत्त्वावर घेऊन ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने सुमारे ५०-६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बॅँकेने कारवाई केल्याने कंपनी चांगलीच आर्थिक अडचणीत सापडणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार ‘न्यूट्रियंट्स’ला पैसे भरण्यासाठी मुदत दिली होती; पण त्यांनी वेळेत पैसे न भरल्याने बॅँकेला पुढील कार्यवाही सुरू करावी लागत आहे. त्यातून कंपनीशी झालेला करार रद्द करीत ताब्यासाठी नोटीस देण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे.- आमदार हसन मुश्रीफ(अध्यक्ष, जिल्हा बॅँक)