राजाराम लोंढे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बनावट सोनेतारण ठेवण्याचे प्रकार वाढल्याने सर्वच बॅँकांची यंत्रणा हडबडली आहे. कोल्हापूर जिल्हा बॅँकेने शनिवार(दि. १३)पासून सोनेतारणावर तूर्त कर्ज देणे थांबविले आहे. त्याचा परिणाम बॅँकेच्या एकूणच उलाढालीवर होणार असून, दिवसाला सोने तारणावर होणारी सुमारे पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.बॅँका, पतसंस्थांमध्ये मालमत्ता तारणावर कर्ज पुरवठा केला जातो. तारण मालमत्ता मॉर्गेज करून त्यावर कर्जाची उचल दिली जाते. ही प्रक्रिया खर्चिक तर आहेच; पण वेळखाऊ आहे. कमी तारण व झटपट कर्ज मिळवण्याकडे कर्जदारांचा ओढा वाढला आहे. त्यातच बॅँकांमध्ये कर्ज देण्यासाठी अक्षरश: चढाओढ सुरू असल्याने सोनेतारण कर्जयोजनेला गती आली आहे. मालमत्ता तारण कर्जासाठी १३ ते १४ टक्के, तर सोनेतारणाला १२ टक्के व्याजदराने आकारणी केली जाते. चोख प्रतिग्रॅम सोन्याला दोन हजार किंवा सराफाने केलेल्या मूल्यांकनाच्या ७५ टक्के रक्कम यापैकी कमीत कमी रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. हे कर्ज थकले तर तारण सोन्याचा लिलाव करून त्यातून कर्जाच्या पैशाची वसुली करता येत असल्याने हे कर्ज सगळ्यांत सुरक्षित आहे; त्यामुळेच राष्टÑीयीकृत बॅँकांसह सहकारी बॅँका, पतसंस्थाही या योजनेकडे आकृष्ट झाल्या असून बॅँकांची उलाढालही वाढली आहे.अलीकडे या योजनेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. जिल्हा बॅँकेच्या कसबा बावडा शाखेत सराफ व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट सोने तारणातून ३२ लाखांचा केलेला अपहार उघडकीस आला. हे प्रकरणशमते न शमते तोच जिल्ह्यातील बनावट सोन्याचे रॅकेट पोलिसांनी पकडले, यामध्ये जिल्हा बॅँकेच्या तीन शाखांत बनावट सोने ठेवून कर्जाची उचल केल्याचे उघडकीस आले. कसबा बावडा शाखेतील बनावट सोने अपहारानंतर जिल्हा बॅँकेने सोने तपासणीसाठी मशीन खरेदी केले असतानाही पुन्हा बनावट सोने तारण उघडकीस आल्याने बॅँकेचे प्रशासन चांगलेच हडबडले आहे; त्यामुळे बॅँकेतील सोनेतारण कर्जयोजना तात्पुरती थांबविली आहे.बनावट सोने कर्ज वसुलीचा प्रश्नबॅँकेच्या दोन शाखांतील तीन प्रकरणांत बनावट सोने उघडकीस आले आहे. या कर्जदारांकडील वसुलीच्या हालचाली बॅँकेच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत; पण संबंधितांपैकी दोघांच्या नावावर मालमत्ताच नसल्याचे समजते, त्यामुळे त्यांच्याकडील कर्जवसुलीचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा बॅँकेच्या वर्तुळात सुरू आहे.जिल्हा बॅँकेत रोज सुमारे पाच कोटींचे सोनेतारण कर्ज दिले जाते. वर्षभरात १०० कोटींचे कर्जवाटप केले असून, सप्टेंबरअखेर त्यातील ५० कोटी येणे बाकी आहे. सोनेतारण कर्जवाटप थांबविल्याने कोट्यवधीची उलाढाल ठप्प होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा बॅँकेने ‘सोनेतारण’ कर्ज थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:45 AM