ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १८ - नोटाबंदीच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या तब्बल २७० कोटी रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेकडून स्विकारण्याचा मार्ग मोकळा झाला. नाबार्ड ने ५० हजारापेक्षा अधिक जमा झालेल्या खात्यांची ‘केवासी’ पडताळणी केली, यामध्ये सगळ्या खात्यांची पुर्तता झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात बॅँकेत पडून असलेले पैसे बदलून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसात जिल्हा बॅँकेच्या १९१ शाखांत तब्बल २७० कोटीच्या जुना नोटा जमा झाल्या होत्या. रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार दोन लाखापेक्षा जास्त जमा झालेल्या खात्यांची यापुर्वीच तपासणी नाबार्ड ने केली होती. पण स्विकारलेले पैसे बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने काहीसी असमर्थता दर्शवल्याने जिल्हा बॅँकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने ५० हजारापेक्षा अधिक जमा झालेल्या खात्यांची ‘केवायसी’ तपासणीनी करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते, त्यानुसार रिझर्व्ह बॅँकेने नाबार्डच्या माध्यमातून सोमवार पासून ‘केवायसी’ ची पडताळणी केली. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकार नंदू नाईक यांच्यासह सहा सदस्यांनी शुक्रवारी पडताळणीचे काम पूर्ण करून शनिवारी एकत्रीत अहवाल तयार केला.