कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याबाबतचा जिल्हा बॅँक व न्यूट्रियंट्स कंपनी यांच्यातील वाद आता लवादाकडे गेला आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन ही याचिका मध्यस्थाकडे देण्याबाबतचा निर्णय झाला. मंगळवारी (दि. २१) विधि व न्याय प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.‘दौलत’ भाडेतत्त्वाचा न्यूट्रियंट्स कंपनीशी असलेला करार जिल्हा बॅँकेने रद्द ठरविला. ‘न्यूट्रियंट्स’ ने करारातील अटींनुसार कर्जाचा हप्ता न दिल्याने बॅँकेने करार रद्द करीत कारखान्याचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. याविरोधात कंपनीने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. यावर शुक्रवारी सुनावणी झाली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन हा विषय लवादापुढे ठेवण्याचे आदेश दिले. विधि व न्याय प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांच्यासमोर याबाबतची सुनावणी मंगळवारी (दि. २१) होणार आहे.दरम्यान, आजच्या सुनावणीमध्ये ‘दौलत’ कारखाना प्रशासन थर्ड पार्टी म्हणून दाखल झाले. अॅड. वाघ यांच्या माध्यमातून कारखान्याने आपली बाजू मांडली.