कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या घडामोडींना आता उन्हाळी सुटीनंतर म्हणजे सोमवार (दि. ४) नंतर वेग येणार असल्याचे दिसते. यासाठी १५ जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन पॅनेल होण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे हे आहेत.जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, जॉइंंट सेक्रेटरी व लोकल आॅडिटर यांसह १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. उन्हाळी सुटीमुळे बहुतांश वकील हे सुटीवर आहेत. गेल्या निवडणुकीत दोन पॅनेल झाली होती. त्याप्रमाणे यंदाही दोन पॅनेल होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी वकील बांधव सातत्याने लढा देत आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे; पण सर्किट बेंचला अद्याप राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. प्रत्येक निवडणुकीत सर्किट बेंचचा मुद्दा असतो.
कसबा बावडा येथील नवीन न्यायसंकुल इमारतीतील कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमध्ये १५ जूनला सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान व त्यानंतर सायंकाळी सहानंतर मतमोजणी होणार आहे. अॅड. सुभाष पिसाळ हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
असा राहणार निवडणूक कार्यक्रम :
- * वर्गणी भरणे -चार ते सहा जून,सायंकाळी ५ वा.पर्यंत
- * कच्ची मतदार यादी व त्यावरील हरकती - १० जून
- * पक्की मतदार यादी प्रसिद्ध - ११ जून, दुपारी ४ वा.
- * उमेदवारी अर्ज देणे व भरणे - ११ व १२ जून (सकाळी ११ ते दुपारी ४ वा.)
- * अर्ज छाननी व छाननीनंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध -१२ जून , दुपारी ४ वा.पर्यंत.
- *उमेदवारी अर्ज माघार - १३ जून, सकाळी ११ ते दुपारी ४ वा.पर्यंत
- *उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे - १३ जून, सायंकाळी ५ वा.
- * मतदान -१५ जून, सकाळी दहा ते दुपारी ४ या वेळेत
- * मतमोजणी व निकाल -१५ जून, २०१८. सायंकाळी सहा वाजल्यानंतर.