समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील सत्तेचा दोन दिवसांसाठी प्रज्वलित झालेला भाजपचा दिवा अखेर मंगळवारी दुपारी विझला; त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या भाजपचा कोल्हापूर जिल्ह्यात पाय आणखी खोलात गेला आहे. सामूहिक कोंडीचा अनुभव भाजपला जिल्ह्यात घ्यावा लागणार असून, यापुढच्या काळात जुने कार्यकर्ते आणि आयात नेते यांना टिकविण्यामध्ये नेतृत्वाचा कस लागणार आहे.
पाच वर्षांपूर्वी शिवसेना भाजपची सत्ता आली. चंद्रकांत पाटील यांना एकापेक्षा एक महत्त्वाची खाती मिळत गेली. मुख्यमंत्रिपदासाठीचे पर्यायी नेतृत्व अशी त्यांची प्रतीमा झाली; परंतु हे होत असताना आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे त्यांच्याशी आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणांशी संघर्ष करत राहिले.
शिवसेना आणि भाजप सत्तेत असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातही या दोघांचे फारसे सख्य नव्हते; परंतु युतीधर्मामुळे प्रचार प्रारंभ, सभा, मेळावे एकत्र घेतले जात होते. मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या सहकार्यातून खासदार झालेले संजय मंडलिक यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतली.नुक त्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या जागा पाडण्याच्या नादात शिवसेना आणि भाजपचे जबर नुकसान झाले; मात्र मुश्रीफ, पाटील, मंडलिक यांची खेळी यशस्वी झाली. आता पुन्हा हाच ‘कोल्हापूर पॅटर्न’, ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत राज्यात सत्तेवर आला आहे. गेले महिनाभर सत्तासंघर्ष सुरू असताना अचानक अजित पवार यांच्या साथीने देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता संपादनाचा केलेला खेळ अंगलट आला.
आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेचे तीव्र पडसाद जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उमटणार यात शंका नाही. सध्या १0 पैकी पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, ॠतुराज पाटील हे चार आमदार काँग्रेसचे, हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील हे दोघे राष्ट्रवादीचे आणि प्रकाश आबिटकर हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. जनसुराज्यचे एकमेव आमदार विनय कोरे आणि अपक्ष प्रकाश आवाडे यांनी आधीच भाजपला पाठिंबा दिला आहे, तर राजेंद्र्र पाटील- यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
राज्यातील या सत्तांतरानंतर खासदार संजय मंडलिक यांच्या सहकार्याने हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील जिल्ह्यातील राजकारणामध्ये धमाके उडविणार हे निश्चित आहे. त्याची सुरुवात जिल्हा परिषदेतूनच होणार आहे. त्यानंतर एप्रिल २0२0 मध्ये जिल्ह्यातील सर्वांत शक्तिमान अशा ‘गोकुळ’ची निवडणूक आहे. याच निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना वगळून आघाडी करण्यासाठी मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्यावर दबाव आणू शकतात.
येत्या पंधरवड्यामध्ये बाराही पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड आहे. आत्ताच १२ पैकी ९ पंचायत समित्यांचे सभापती हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आहेत. तेथेही हे नेते जातीने लक्ष घालणार यात शंका नाही. पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहून संघर्ष करत राहिलेले हे दोन्ही नेते पुन्हा एकदा जिल्ह्याच्या सत्तेवर पक्की मांड ठेवण्यासाठी पावले उचलणार यात शंका नाही.
- कार्यकर्ते टिकविण्याचे भाजपसमोर आव्हान
जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी अनेकांना भाजपमध्ये घेतले. यातील अनेकांना महामंडळे जाहीर केली. ज्याची अधिकृत पत्रेही अनेकांना मिळाली नाहीत; मात्र विधानसभेवेळी समरजितसिंह घाटगे यांच्यापासून अशोक चराटी, अनिल यादव, अशोक राव माने, अशी अनेक मंडळी भाजपपासून दूर झाली. नव्यांच्या भरण्यामुळे दुखावलेले भाजपचे जुने कार्यकर्ते आणि नाळ न जुळलेले नवे कार्यकर्ते या सगळ्यांनाच सत्ता नसताना टिकविण्याचे आव्हान आता भाजप नेतृत्वासमोर असेल.
- महाडिकांचा कस लागणार
केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे; त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता भाजप सहजासहजी सोडणार नाही, अशी सर्वांची अटकळ होती. त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि महाडिक परिवारालाही दिलासा मिळाला. लोकसभा, विधानसभेच्या पराभवानंतरही राज्यात सत्ता आली तर किमान पाठबळ असेल, असे सर्वांनाच वाटत होते; मात्र फडणवीस सरकार कोसळले आणि महाडिकांच्याही यापुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाडिक यांचा प्रत्येक तालुक्यात गट आहे म्हणूनच त्यांना चंद्रकांत पाटील यांनी थेट राज्य उपाध्यक्ष पद दिले; त्यामुळे यांचा आणि बंधू अमल महाडिक यांचाच आता खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. राज्यात सत्ता नसताना भाजप टिकविण्यासाठी जबाबदारी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांना पेलावी लागणार आहे.
- मंडलिक, माने, आबिटकर यांच्यावरही जबाबदारी
ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार होते. त्याच जिल्ह्यात पाच उमेदवार पराभूत झाले; त्यामुळे शिवसेनेला बळ देण्यासाठी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना अधिक सक्रिय व्हावे लागणार आहे.