कोल्हापूर : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील पहिल्या पाच क्रमांकातील आर्थिकदृष्ट्या मजबूत बँक असा नावलौकिक असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंगळवारी अत्यंत नाट्यमयरीत्या दोन्ही काँग्रेस व भाजपची आघाडी आकारास आली. शेवटपर्यंत तीन जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला त्या जागा न मिळाल्याने त्यांनी प्रक्रिया, दूध, पतसंस्थांसह राखीव गटातील नऊ जागांवर स्वतंत्र पॅनेल करून शड्डू ठोकला आहे. बँकेसाठी ५ जानेवारीस मतदान होत आहे.
बँकेत सध्या दोन्ही काँग्रेससह शिवसेनेची सत्ता आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे बँकेचे गेली पाच वर्षे अध्यक्ष आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. सेवा संस्था गटातून स्वत: मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार सर्वश्री पी. एन. पाटील, राजेश पाटील, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक व ए. वाय. पाटील हे सहाजण बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांत सेवा संस्था गटातून निवडणूक होत आहे.
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेला सहा जागांवर संधी दिली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या पक्षाला दोन जागा व एका जागेवर स्वीकृत संचालक घेण्याचे सत्तारूढ आघाडीने मान्य केले होते. परंतु शिवसेनेला हा तोडगा मान्य झाला नाही. त्यांनी तीन जागा मिळाल्या तरच आम्ही तुमच्याबरोबर येऊ, अन्यथा आमचा मार्ग मोकळा, अशी ताठर भूमिका घेतल्याने अखेरपर्यंत तोडगा निघाला नाही.
खासदार संजय मंडलिक व शेका पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची त्यांनी घोषणा केली. त्यातही खासदार धैर्यशील माने यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने या सत्तारूढ आघाडीसोबतच राहिल्या. सत्तारूढ आघाडीच्या विरोधातील नाराजांना एकत्र करून शिवसेनेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्तारुढ व विरोधी पॅनलची नावे
सत्तारुढ आघाडी-
प्रक्रिया गट - मदन कारंडे (इचलकरंजी) व प्रदीप पाटील-भुयेकर. (भुये)
दूध व इतर संस्था गट - भैया माने. (कागल)
पतसंस्था - प्रकाश आवाडे (इचलकरंजी)
महिला - निवेदिता माने (रुकडी) व ऋतिका शाहू काटकर (पोहाळे)
अनुसूचित जाती - राजू आवळे (इचलकरंजी)
भटक्या विमुक्त जाती - स्मिता गवळी (पाचगाव)
इतर मागासवर्गीय - विजयसिंह माने. (अंबप)
राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी -
प्रक्रिया गट - संजय मंडलीक (मुरगूड) व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर (आसुर्ले)
दूध व इतर संस्था गट - क्रांतीसिंह संपतराव पवार-पाटील (सडेली खालसा)
पतसंस्था - अर्जुन आबीटकर (गारगोटी)
महिला - लतिका पांडुरंग शिंदे (वेतवडे) व रेखा सुरेश कुराडे (ऐनापूर)
अनुसूचित जाती - उत्तम रामचंद्र कांबळे (कागल).
भटक्या विमुक्त जाती - विश्वास जाधव (कोडोली)
इतर मागासवर्गीय - रवींद्र बाजीराव मडके (म्हारुळ).