कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक जशी लांबत चालली आहे तसे इच्छुक अस्वस्थ होत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने होणारी ‘भांडवली गुंतवणूक’ वाढतच चालल्याने ही अस्वस्थता आहे. म्हणूनच उच्च न्यायालयात थांबलेली ही निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी यासाठी याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, मतदार यादीतील संस्थांच्या सहभागावरून काही सेवा संस्था न्यायालयात गेल्या आहेत. शेजारच्या सांगली, सातारा जिल्हा बँकांच्या निवडणुका लागल्या असून, त्यांचे मतदानही जवळ आले आहे; परंतु कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय उच्च न्यायालयात का रखडला आहे, याचे उत्तर कोणाजवळ नाही.
सेवा संस्था गटातील बाराही तालुक्यांतील जागांवर इच्छुक असलेल्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जोडण्या घालायला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी ठराव करतानाही अशीच तयारी करावी लागली होती. दिवाळीच्या निमित्ताने सर्व गटातील इच्छुकांनी आपली जिल्हा बँकेचा फोटो छापून आपली शुभेच्छापत्रेही जिल्हाभर पाठवली. सार्वजनिक कार्यक्रमात फारसे न दिसणारे काही लोकप्रतिनिधी यानिमित्ताने जिल्ह्याचा दौराही करू लागले. परंतू तरीही निवडणूक लागलेली नाही.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बंकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या अनेक बैठका घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. परंतु निवडणुकीचा कार्यक्रमच जाहीर होत नसल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. आता तर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली तरी जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होत नसल्याने नेत्यांसह इच्छुकही अस्वस्थ आहेत.
सहलीवर पाठवलेल्यांचा खर्च वाढतोय
आजऱ्यासारख्या काही तालुक्यांमध्ये सेवा संस्था गटात मोठी चुरस आहे. त्यामुळे दिवाळीनंतर दोन्ही गटांनी काही निवडक मतदारांना सहलीवर पाठवले आहे. परंतु निवडणुकीबाबतचा न्यायालयातील निर्णय प्रलंबित असल्याने सहलीचा खर्च किती दिवस वाढणार याची चिंता आता उमेदवारांना लागून राहिली आहे.
प्रलोभनांची वाढती संख्या
काही ठरावधारकांच्या मुलांना बंका, साखर कारखाना, दूध संघामध्ये नोकऱ्या देण्याचेही आश्वसान देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी सेवा संस्था गटात अतिशय अटीतटीची परिस्थिती आहे तिथे दोन्ही गटाकडून नाेकऱ्यांच्या ऑफर्स सुरू झाल्याने कोणती नोकरी स्वीकारावी याचाही प्रश्न काही जणांना पडला आहे.