कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) चाचणी लेखापरीक्षणाला ब्रेक लागला आहे. ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार २२ जानेवारी २०२३ ला दुग्ध विभागाच्या आदेशानुसार विशेष लेखापरीक्षक २०२१-२२ या आर्थिक वर्षाची तपासणी करणार होते. राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करण्यास सत्तेतीलच नेत्यांचा विरोध असल्याने ही चौकशी थांबल्याचे समजते.‘गोकुळ’ दूध संघाच्या लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालात खरे व अचूक चित्र उघडकीस आणलेले नाही. लेखापरीक्षण अहवालात परिशिष्ट अ, ब, क असतात. परिशिष्ट अ मध्ये गंभीर मुद्यांची नोंद केली जाते, याच मुद्यांची चाचणी लेखापरीक्षणात तपासणी करावी, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केलेली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार रा. सं. शिर्के यांनी संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांना दिले होते. आदेशापासून दहा दिवसांत तपासणी करून संबंधित विभागाला अहवाल द्यायचा होता.विशेष लेखापरीक्षक मसुगडे यांनी तयारीही केली होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असलेल्या ‘गोकुळ’वर राजकीय आकसातून कारवाई करू नये, यासाठी स्थानिक नेत्यांनी पूर्वीच्या मित्रांच्या (सध्या भाजपचे नेते) साथीने चौकशी थोपवण्यात सध्या तरी यश मिळवले आहे.जिल्हा बँकेच्या तपासणीसाठी चौघांची नियुक्तीजिल्हा बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) डी. टी. छत्रीकर यांना दिले होते. त्यानुसार छत्रीकर यांनी कोल्हापूर जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील, सांगली जिल्हा विशेष लेखापरीक्षक संजय पाटील, सातारा जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे व विशेष लेखापरीक्षक वर्ग -२ अनिल पैलवान यांची नियुक्ती केली आहे. ते तपासणीसाठी बँकेत गेले. मात्र, संबंधित कागदपत्रे ‘ईडी’च्या ताब्यात असल्याने ते परत आले. तसा अहवाल त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.
Kolhapur News: ‘गोकुळ’च्या चाचणी लेखापरीक्षणास ‘ब्रेक’, कारवाईला सत्तेतील नेत्यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:13 PM