कोल्हापूर- सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषदेची झाली नाही एवढी चर्चा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची सुरू आहे. दोन्ही काँग्रेसच्या साथीला भाजप, अर्धी शिवसेना आणि विरोधात उरलेली शिवसेना आणि शेकापसह अन्य गट अशी राजकीय परिस्थिती असल्यामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळेच ३१ डिसेंबरच्या रात्री कवितांची मैफल जमवण्याची कल्पना आम्ही मांडली.
परंतु दिवसा जाहीर प्रचार आणि रात्री ‘जोडण्या’ यामुळे नेत्यांनी सगळाच प्रस्ताव रद्द न करता गेल्या दोन वर्षातील सवयीमुळे ‘ऑनलाईन’ मैफल घेण्यास मान्यता दिली. अखेर प्रत्येक नेत्याने ‘व्हॉटसॲप’वर आपल्या चारोळ्या पाठवायचे ठरले. अर्थात जिल्ह्याचे आणि जिल्हा बँकेचे नेते म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली चारोळी तातडीने पाठवली.
झंझट नको म्हणून,गेला बिनविरोध करायलाआबिटकर बंधुंच्या मुळं,लागलं जिल्ह्यात फिरायला
लगेचच विधानपरिषद कमी खर्चात बिनविरोध पदरात मिळाल्यामुळे खुश असलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली चारोळी पाठवली. डी. वाय. कारखान्याच्या निवडणुकीत गुंतलेल्या पाटील यांनी वेळ काढून आपली सावध भूमिका मांडली.
सहकाराच्या पंढरीमध्येहळूहळू चाला,वैयक्तिक कशालाजिल्हा बँँकेवर बोला
आता प्रोटोकॉलप्रमाणे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची पाळी आली. त्यांच्याविरोधात तालुक्यात अनेकजण एकत्र आल्याने त्यांनी त्याला अनुसरूनच आपल्या भावना मांडल्या.
पहिल्याच वेळी आमदार, मंत्रीजमवून आणले सूत्र,म्हणून तालुक्यातील विरोधकझाले सगळे एकत्र
आता ज्येष्ठ नेेते असलेले आमदार पी. एन. पाटील यांना चारोळी पाठवायची होती. त्यांनी चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या ‘व्हॉटसॲप’वरून पाठवली.
दुसरा विचार केला नाहीनेहमी मानलं हाताला,दिलं बँकेचं चेअरमनपदतर, नकोय का कुणाला
एवढ्यात जनसुराज्यचे कारभारी प्रा. जयंत पाटील यांचा मेसेज आला. अहो, चंद्रकांतदादा पाटील पण आहेत. त्यांची चारोळी विसरायला नको. मग, राहुल चिकोडे यांच्याशी संपर्क साधला गेला आणि त्यांच्याच ‘व्हॉटसॲप’वरून दादांची चारोळी आली
संघर्षातून कटुता वाढते,म्हणून घेतली माघार,माझ्यामागे राज्याचा व्यापम्हणून निर्णय घेणार आण्णा आणि सावकार
‘सावकार’ असा शब्द आल्याने मग समित कदम यांच्यामार्फत त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि अखेर कदम यांनीच चारोळी पाठवून दिली.
समन्वयाचे गीतसध्या मी रोज गातो,बिनविरोधचा मार्गवारणानगरातून जातो
या चारोळीला हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी लगेचच ‘थम्ब’दाखवले.
आमदार प्रकाश आवाडे यांची चारोळी तोपर्यंत आली. त्यांच्या डोक्यात पुढची लोकसभा असल्याचं यावरून जाणवलं.
यापुढच्या राजकारणातआम्ही सर्वत्र असणार,पुढच्या लोकसभेनंतरराहुलला दिल्लीला पाठवणार
तोपर्यंत संजय पवार यांचा फाेन आला. अहो, शिवसेनेच्या कोणाचीच चारोळी कशी नाही. मग, खासदार संजय मंडलिक यांची चारोळी घेण्याचे ठरले.
सारखं, सारखं, तुम्हा दोघांचंऐकून कोण घेणार,शिवसेनेचा वाघ खवळलाय,केडीसीचं पाणी ढवळणार
मंडलिकांच्या या चारोळीनंतर लगेचच आमदार प्रकाश आबिटकर यांची चारोळी आली.
जिथं तिथं तुम्हीचअसं नाही चालणार,यापुढच्या काळात सुद्धातुम्हांला घाम फोडणार
या दोन चारोळ्या पाहिल्यानंतर मात्र खासदार धैर्यशील माने यांना राहवलं नाही. त्यांनी चारोळी पाठवून दिली.
सहकाराच्या मंदिरातराजकीय झूल कशाला,शिवसेना सोडली नाहीएवढं ओरडताय कशाला
तोपर्यंत चंदगडातून फोन आला. चंदगडसारख्या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यावर अन्याय करू नका. मग, आम्ही आमदार राजेश पाटील यांना चारोळी पाठवण्याची विनंती केली. त्यांनीही लगेच ती पाठवून दिली.
नरसिंगराव साहेबांचीपुण्याई आहे गाठीशी,चंदगडात भरमूआण्णागहिंग्लजात मुश्रीफ साहेब पाठीशी
तोपर्यंत आमदार राजूबाबा आवळे यांनीही आपली चारोळी पाठवली.
‘जयवंत’,‘सतेज’‘हसन’,‘पांडुरंग’यांच्या नेतृत्वाखालीविजयाचा चंग
दोन्ही खासदार आणि नऊ आमदार झाल्यानंतर मग, युवा आमदार ऋतुराज पाटील यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. ते म्हणाले, काकांची चारोळी घेतलेय, तर माझी कशाला. पण, त्यांना आग्रह केला गेला. मग, त्यांनी चारोळी पाठवून दिली.
‘डी.वाय.’नावाचे दैवतआहे माझ्या उशाशी‘बाबा’,‘काका’असतानामला भीती कशाची
या सगळ्या चारोळ्या वाचल्यानंतर अनेक नेत्यांनी हशा, टाळ्या, आनंद व्यक्त केल्या. एवढ्यात खुद्द हसन मुश्रीफ यांचा फोन आला. ते म्हणाले, महादेवराव महाडिक यांच्या चारोळीशिवाय ही मैफल पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचीही चारोळी घ्या..
अखेर महाडिक ‘आप्पां’ना फोन लावला गेला. ते म्हणाले, मी तोंडीच सांगतो,
सामान्यांना पदे देण्याचीमला आहे गोडी‘मुन्ना आणि अमल’ही माझी खिलार जोडी
आणि अशा पद्धतीने ३१ डिसेंबर निमित्त आयोजित केलेली ही ऑनलाईन मैफल संपन्न झाली.
(नेत्यांच्या न झालेल्या ऑनलाईन काव्य मैफलीचा वृत्तांत)