कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसभरात ३९ ने वाढली असून आता सायंकाळी सहापर्र्यत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर शहरातील विक्रमनगर येथील एका युवतीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाठोपाठ पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार आणखी ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा आतापर्यंत १२२ इतका झाला आहे. ही माहिती सायंकाळी सहा वाजता सीपीआर प्रशासनाने जाहीर केली.
कोल्हापूर शहरात सोमवारी एकाच दिवसात चार रुग्ण आढळून आल्यानंतर आज मंगळवारी विक्रमनगर येथील दाट वस्तीत एक अठरा वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली. या तरुणीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना देऊनही ती घरीच थांबली होती, त्यामुळेच प्रशासनाची चिंता वाढली आहे.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आजरा तालुक्यातील चौघांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८७ झाली आहे. आजरा तालुक्यातील बेलेवाडी येथील तिघेजण तर भादवण येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.