कोल्हापूर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरही सहभागी असल्याचे चित्र आज, बुधवारी स्पष्ट झाले. मंत्री राजेंद्र यड्रावकर हे काल मुंबईकडे निघाले होते मात्र मध्येच त्यांनी यु-टर्न घेतला.मंगळवारी सकाळपासूनच आमदार आबिटकर यांचे बंधू प्राचार्य अर्जुन आबिटकर हे आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगत होते. पक्षाशी गद्दारी आपल्या डोक्यात आणि रक्तातही नाही असे त्यांचे म्हणणे होते. आमदार आबिटकर यांच्याशी संपर्क झाला असून ते वर्षा निवासस्थांनी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीस जाणार असल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.आबिटकर लपवतायत तोंडआज, बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांचा व्हीडीओ व फोटोही व्हायरल झाला. त्यामध्ये आमदार आबिटकर दिसतात. परंतू फोटोमध्येही व व्हिडीओमध्येही ते तोंड लपवत असल्याचे स्पष्ट दिसते. शिंदे यांचे बंड त्यांना मान्य नाही..त्यांची निष्ठा शिवसेनेशीच आहे का, की ते द्विधा मनस्थितीत आहेत असे प्रश्र्न त्यातून उपस्थित झाले. सूरतला तरी ते गेले आहेत आणि मग तोंड का लपवत आहेत अशीही विचारणा लोकांतून झाली.यड्रावकर मुळचे सेनेचे नव्हेतचआरोग्य राज्यमंत्री यड्रावकर हे मुळचे शिवसेनेचे कार्यकर्ते नव्हेत. विधानसभा निवडणूकीनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांनी हातात शिवबंधन बांधले. त्यांनी मंत्रीपदासाठी योग्य ती रसद पुरवली होती. त्यामुळे जरी ते शिवसेनेचे मंत्री म्हणून सरकारमध्ये असले तरी शिवसेनेच्या स्थानिक कार्यक्रमात फारसे उत्साहाने कधीच सहभागी झाले नाहीत. शिरोळ विधानसभा मतदार संघातही त्यांना शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांचा टोकाचा विरोध होता. या मतदार संघात यड्रावकर यांनीही कधीच मुळच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विश्र्वासात घेतले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल पक्ष संघटनेतही नाराजी होतीच.
कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री राजेंद्र यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकरही बंडात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 2:48 PM