कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी उद्या, रविवारी जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील व शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता असून बैठकीत त्यांच्याच नावाच्या शिफारसी प्रदेशकडे केली जार्ईल.राष्ट्रवादी पक्षातंर्गत गेले तीन-चार महिने सभासद नोंदणीपासून निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. मध्यंतरी जिल्हाध्यक्ष निवडी जाहीर केल्या पण प्रदेशाध्यक्षांनी अचानक निवडी लांबणीवर टाकल्या. आता रविवारी निवडी घेण्याचे आदेश प्रदेशने दिले असून तालुकाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, नगरपालिका शहराध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची मते आजमावून घेऊन त्या नावाची शिफारस प्रदेशकडे केली जाते.
जिल्हाध्यक्ष म्हणून ए. वाय. पाटील यांनी गेले तीन वर्षे आक्रमकपणे काम केले. सर्वच तालुक्यांतील गटबाजी संपवत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळू शकते. पाटील यांना बदलायचे झाल्यास जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचे नाव पुढे येऊ शकते.
पक्षाच्या स्थापनेपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातीलच जिल्हाध्यक्ष झाला आहे. त्याची सल हातकणंगले मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरांच्या रूपाने हातकणंगले मतदारसंघाला संधी द्यावी, असा प्रयत्नही होऊ शकतो; पण पक्षातंर्गत घडामोडी पाहता सध्या ‘ए. वाय.’ यांनाच संधी दिली जाऊ शकते.
शहराध्यक्षपदासाठी दुपारी तीन वाजता बैठक होत आहे. राजेश लाटकर यांनी तीन वर्षांत चांगले काम करत पक्षातंर्गत मतभेद मिटवत जुन्या-नव्यांना एकत्रित बांधले आहे. त्यांच्याशिवाय माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या नावाची चर्चा असली तरी सध्या तरी लाटकर यांचेच पारडे जड वाटते. अजितदादांचे ‘ए. वाय.’ना पाठबळ?हल्लाबोल आंदोलनाच्या गारगोटी येथे झालेल्या सभेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी के. पी. पाटील यांची उमेदवारी जाहीर केली; पण हे भाजप नव्हे असे सांगत येथील उमेदवारीचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवारच घेतील, असे सूतोवाच करून अजित पवार यांनी एकप्रकारे ‘ए. वाय. पाटील यांची पाठराखणच केल्याची चर्चा आहे.