कोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १९ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्यामध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघावर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. त्यात स्मित पाटील याने नाबाद ६२ धावा, तर अनिकेत नलवडे याने ५१ धावा करून आणि क्षितिज पाटील याने चार बळी घेऊन कोल्हापूर जिल्हा संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रायगड जिल्हा संघाने ३२. २ षटकांत सर्वबाद १२६ धावा केल्या. त्यामध्ये मल्हार वंजारीने ४५, चिन्मय पाटीलने ३९, ओम जाधवने १० धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा संघाच्या क्षितिज पाटीलने चार, तुषार पाटीलने तीन, श्रेयस चव्हाणने दोन, तर अभिषेक निषादने एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना कोल्हापूर जिल्हा संघाने २१.५ षटकांत एक बाद १३० धावा केल्या. त्यामध्ये स्मित पाटीलने नाबाद ६२, तर अनिकेत नलवडे याने ५१ धावा केल्या. रायगड जिल्हा संघाच्या चैतन्य पाटीलने एक बळी घेतला. अशा प्रकारे कोल्हापूर संघाने नऊ गडी राखून विजय मिळविला.
फोटो (०९०३२०२१-कोल-स्मित पाटील (क्रिकेट), अनिकेत नलवडे (क्रिकेट), क्षितिज पाटील (क्रिकेट)