कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे. आज, गुरुवारी पहाटे शहराचा पारा १८ अंशांवर होता आणि धुक्याने अवघे कोल्हापूरकर वेढून गेल्याची प्रचिती पहाटे फिरणाऱ्यांना आली. दिवसभर हवेत असणारा गारठा रात्री आणखी वाढतो. त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.शेतीसाठी ही थंडी पोषक असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटी आलेल्या थंडीचा आता चांगलाच जम बसला आहे. उत्तर भारतात आलेल्या चक्रवातामुळे महाराष्ट्राच्या सर्वच भागात तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. शहरात दिवसभर हवेत गारठा असतो. रात्री आठ वाजल्यानंतर तापमानात घट होऊन लागते. त्यानंतर थंडीचा जोर वाढतो. पहाटे थंडी सर्वाधिक असून दाट धुके पसरलेले असते. जिल्ह्याचे तापमान पहाटे १८ अंश सेल्सियसपर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभरात २९ अंश सेल्सियस तापमान होते. वाऱ्याचा वेगही ६.६५ इतका राहिला. ईशान्य मान्सूनचा जोर संक्रांती दरम्यान ओसरुन, तेथील हिवाळी पावसाचा हंगाम ह्या वर्षी १४ जानेवारीला आटोपला आहे. हा मान्सून डिसेंबरमधेच ओसरणार होता, मात्र यंदा त्याला वेळ लागला आहे. तेथील मान्सून बाहेर पडताच थंडीसाठी पूरकता वाढते. सरकलेल्या 'पोळ' (' रिज ')मुळेच उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना हवेच्या उच्च दाबरुपी काल्पनिक भिंतीचा अडथळा दूर होवून महाराष्ट्रात काहींशीच थंडी वाढत आहे. सध्याच्या 'एल-निनो' च्या प्रभावामुळे, एकापाठोपाठ पास होणारे पश्चिम झंजावात हे कमी तीव्रतेनेच पास होत आहे. उत्तर भारतातही सध्या थंडीची तीव्रता कमीच आहे म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. मकर संक्रांतीनंतर पृथ्वीचा दक्षिण गोलार्धातील भाग हळूहळू सूर्यापासून दूर तर विषववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातील भाग पुन्हा सूर्यासमोर अधिक येणे म्हणजेच पृथ्वीचे उत्तरायण चालू होते.
पारा १८ अंशांवर, थंडीने कोल्हापूरकर गारठले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 7:23 PM