कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल ९७.४५ टक्के लागला असून विभागाने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ०.७२ टक्क्यांनी निकालात वाढ झाली असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.या परीक्षेत कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील २३२७ शाळांमधील १ लाख २७ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १ लाख २४ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विभागात कोल्हापूर जिल्ह्याने पुन्हा बाजी मारली असून कोल्हापूरचा निकाल ९८.२० टक्के इतका लागला आहे. सातारा जिल्ह्याचा निकाल ९७.१९ टक्के लागला असून विभागात दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर सांगली जिल्ह्याचा निकाल ९६.६६ टक्के लागला. कोल्हापूर विभागाचा गतवर्षी ९६.७३ टक्के इतका निकाल लागला होता.