कोल्हापूर : अनिश्चित दरामुळे शाहू महाराजांनी वसवलेली गूळाच्या बाजारपेठेला अगोदरच घरघर लागली आहे. त्यात भेसळीच्या नावाखाली वेठीस धरून ‘कोल्हापूरी गूळा’ची बदनामी सुरू आहे, शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा गूळ उत्पादकांनी अन्न-औषध प्रशासन विभागाला दिला. ‘कोल्हापूरी गूळाची आतापर्यंत एकाही सॅँपलमध्ये भेसळ आढळली नसल्याची कबुली अन्न-औषधचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिली.
यावर हरकत घेत संजय पाटील (वडणगे), शिवाजी पाटील (कोपार्डे) म्हणाले, मग कशाचा वापर करायचा ते सांगा? गूळ खाऊन किती माणसे मेली? संत्र्याच्या तयार केलेली दारू पिऊन माणसे मरतात, मग संत्र्यावर बंदी का घालत नाही. तानाजी आंग्रे (वरणगे) म्हणाले, शालेय पोषण आहारात चटणी म्हणून मुले राख, लेंड्यांचा भात खातात त्यावेळी तुमचे खाते कोठे जाते? कायदा फक्त शेतकऱ्यांनाच का, उद्या समितीत गूळ घेऊन येतो, आडवून दाखवाच.गेले दोन वर्षात कोल्हापूरातील गूळाची एकाही सॅँपलमध्ये भेसळ आढळलेली नाही. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, परवाना न घेतल्याने व्यापाऱ्यांना नोटीसा काढल्याचे केंबळकर यांनी सांगितले. भेसळ नाहीतर कारवाई कसली करता, जाणीवपुर्वक त्रास देणार असाल तर गप्प बसणार नाही, असा इशारा समितीचे संचालक विलास साठे यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, यापुढे समितीत पाय ठेवू नका, असे सभापती कृष्णात पाटील यांनी सुनावले. उपसभापती अमित कांबळे, सचिव मोहन सालपे, उपसचिव राजेंद्र मंडलिक, संचालक उपस्थित होते.