कोल्हापूर : जे सत्याग्रही सन १९७५ च्या आणीबाणीत सहभागी होते, अशा सर्वच सत्याग्रहींना सरकारने निवृत्तिवेतन द्यावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा लोकतंत्र सेनानी संघातर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकमुखी करण्यात आली.भारतीय जनता पक्षाच्या रामभाऊ म्हाळगी सभागृहात झालेल्या या मेळाव्यासाठी २५० हून अधिक त्याकाळचे कार्यकर्ते उपस्थित होते. जे सत्याग्रही अगदी एक दिवसांपासून ते १८ महिन्यांपर्यंतच्या शिक्षा भोगून आले अशा व भूमिगत राहून कार्यकर्त्यांच्या संसारास हातभार लावणे अशा सर्वांना सरकारने निवृत्तिवेतनाचा लाभ द्यावा, अशी मागणी भाऊसाहेब गणपुले यांनी केली.
यास सर्वांनी अनुमोदन दिले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक आप्पासाहेब दड्डीकर होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, लोकतंत्र श्रीकांत शिंदे, विश्वनाथ भुर्के, किरण फडणीस, विजया शिंदे, विद्याधर काकडे, प्रमोद जोशी, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विजया पाटील, स्वाती सखदेव, मधुकर तोडकर, बाबासाहेब कागले, दीपक मराठे, बालूबाई पाटील, दिगंबर पाटकर, आदी उपस्थित होते.