कोल्हापूर : दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांनी मुलांवर आपली मते लादू नयेत. मुलांच्या योग्य भवितव्यासाठी तसेच करिअरसाठी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शिक्षण विभागातील सेवानिवृत्त सहायक संचालक संपत गायकवाड यांनी येथे केले.आपटेनगरजवळील महालक्ष्मी कॉलनी येथे कै. दीप्ती दिलीपराव सासने यांच्या स्मरणार्थ महालक्ष्मी कॉलनी, शांती उद्यान, व्यंकटेश कॉलनी या परिसरातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार सेवानिवृत सहायक संचालक गायकवाड, नगरसेवक राजू दिंडोर्ले, माजी नगरसेविका संगीता सावंत यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.करिअर निवडताना अनेक पर्याय आपल्यासमोर असतात; परंतु योग्य मार्ग निवडणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे मुलांची आवड पाहून त्यांची बुद्धिमत्ता चाचणी (आयक्यू टेस्ट) करून घेऊनच पुढील शिक्षणाचा निर्णय घ्यावा. जर मुलांच्या मनाविरुद्ध पालकांनी काही पर्याय दिले तर मात्र तेथे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते, असे गायकवाड म्हणाले.दिलीपराव सासने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रकाश सुतार, प्रकाश सासने यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी आर. जी. पाटील, मिलिंद पाटील, आंबीगरे, महादेव उपासे, सचिन नवाज, क्रांती सासने, उमा कुंभार, सोनाली सुभेदार, सौ. कामत उपस्थित होते. एम. जी. कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले.