कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या फेरसर्व्हेक्षणात फेरीवाल्यांवर अन्याय केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जर अन्याय आणि भेदभाव करण्याचा प्रयत्न झाला, तर मात्र फेरीवाले रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील, असा इशारा येथे झालेल्या कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने खासगी संस्थेमार्फत सन २०१४ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता शहरातील फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण केले होते; मात्र त्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्यामुळे आता फेरसर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात विचारविनियम करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती.फेरसर्व्हेक्षण करण्याकरिता वॉर्डनिहाय ज्या फेरीवाला समिती नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये त्या त्या भागांत प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना योग्य प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काही समितींवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा समावेश नसल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त केली गेली.सन २०१४ मध्ये खासगी संस्थेमार्फत फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण झाले. त्यानंतर अनेक फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्डचे वाटप करण्यात आले. आता फेरसर्व्हेक्षण करत असताना या बायोमेट्रिक कार्ड दिलेल्या फेरीवाल्यांचे काय करणार? अनेक फेरीवाले पात्र असूनदेखील मागील सर्व्हेक्षणात त्यांचा समावेश झालेला नाही त्यांचे काय करणार? असे प्रश्नही बैठकीत उपस्थित झाले.महानगरपालिका प्रशासन गेल्या पाच-सहा वर्षांपासून फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर काहीही करत नाही. फेरीवाल्यांना निश्चित कायमस्वरूपी जागा द्यावी, त्यांना सुविधा द्याव्यात, आदी मागण्यांबाबत वारंवार भेटी घेतल्या, चर्चा केल्या, आंदोलने केली; परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. यापुढे मात्र आम्ही गप्प बसणार नाही. नव्याने केल्या जाणाऱ्या फेरसर्व्हेक्षणात कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आतापासूनच प्रशासनाने घ्यावी, अशा भावना अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.बैठकीत माजी महापौर आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, सतीश कांबळे, भाऊसाहेब गणपुले, अशोक भंडारे, महंमद शरिफ शेख, किशोर घाडगे, किरण गवळी, सुरेश जरग, राजू जाधव, समीर नदाफ, मारुती भागोजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नितीन पाटील यांनी आभार मानले.