कोल्हापूर : लक्ष्मीपुरी, कोंबडी बाजार येथील जुना लोखंड बाजारवाल्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली हटवू नका, या प्रश्नासाठी आज, सोमवारी दुपारी चार वाजता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना भेटण्याचा निर्णय फेरीवाल्यांनी घेतला.रविवारी सायंकाळी शाहू क्लॉथ मार्केट येथे सर्वपक्षीय फेरीवाल्यांची बैठक झाली. राष्ट्रीय काँग्रेस प्रणित श्री शाहू फेरीवाला युनियन संघातर्फे ही बैठक बोलाविण्यात आली होती.यावेळी महमंदशरीफ शेख म्हणाले, कोंबडी बाजार येथील फेरीवाल्यांना हलवू नका, अशी आमची भूमिका आहे. फेरीवाल्यांची समिती नेमावी, अशीही मागणी आहे; त्यामुळे सर्वांनी एकजुटीने लढले तर हे शक्य होणार आहे.दिलीप पवार म्हणाले, महापालिका प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करते आहे; पण आपण कमी पडतो. फेरीवाल्यांनी एकत्र आले पाहिजे.सुरेश जरग म्हणाले, फेरीवाल्यांचा सर्व्हे झालेला नाही, बायोमेट्रिक झालेले नाही, तरीही फेरीवाल्यांना हटविण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. तुमच्या आंदोलनात मी पाठीशी राहीन.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, सभागृह नेते दिलीप पोवार, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, सरलाताई पाटील, रियाज सुभेदार यांनी, फेरीवाल्यांच्या सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही यावेळी दिली.बैठकीस माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, किरण गवळी, चंदा बेलेकर, किरण मेथे, के. एम. बागवान, किशोर खानविलकर, उमेश पोर्लेकर, प्रदीप शेलार, राजेंद्र महाडिक, चंद्रकांत यादव, विजय नागावकर, राजू शेलार, इर्शाद मणेर, नझीर पठाण यांच्यासह जुना लोखंडी बाजार येथील सुमारे ५२ फेरीवाले उपस्थित होते.