कोल्हापूर : यावर्षी अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी क्षमतेपेक्षा जादा अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुषंगाने वाढीव प्रवेशाचे नियोजन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने केले आहे; त्यामुळे विद्यार्थी, पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही.शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची एकूण प्रवेश क्षमता १३५०० आहे. यावर्षी तिन्ही शाखांसाठी एकूण १४६२३ अर्जांची विक्री झाली. त्यातील १२७०१ अर्ज प्रवेश समितीकडे दाखल झाले आहेत. त्यात विज्ञान शाखेसाठी ६०९४, वाणिज्य मराठी माध्यमासाठी २९३३, इंग्रजी माध्यमासाठी १८२५, कला मराठी माध्यमासाठी १७८९, इंग्रजी माध्यमासाठी ५२ अर्ज दाखल झाले आहेत.
विज्ञान शाखेसाठी ६५४ आणि वाणिज्य शाखेकरिता ३६२ अर्ज हे प्रवेश क्षमतेपेक्षा जादा दाखल झाले आहेत. त्यासाठी वाढीव प्रवेशाचे नियोजन समितीने केले आहे. प्रवेश अर्जांची छाननीची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार असून सोमवारी (दि. ९) निवड यादी प्रसिद्ध होणार आहे.
पसंतीक्रमानुसार प्रवेशयावर्षी विज्ञान, वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज समितीकडे आले आहेत. शहरात विज्ञान शाखेच्या अनुदानित तुकड्या २५, तर विनाअनुदानित तुकड्या ३६ आहेत. वाढीव प्रवेशाचे नियोजन केले आहे. महाविद्यालयांना प्रत्येकी दहा विद्यार्थी वाढवून घेण्याची सूचना केली असल्याचे प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांनी सांगितले. ते म्हणाले, एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. विद्यार्थ्यांनी अर्जात नोंदविलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना प्रवेश मिळेल.