कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांना ‘गोकुळ’च्या संचालकांच्या स्कॉर्पिओच दिसतात. चांगले चाललेले दिसत नाही. आता काही तरी शपथा घेतल्याचे ऐकावयास मिळते. आम्ही खासदारकीला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक प्रचार करायचा आणि तुम्ही आमदारकीला इकडे-तिकडे करणार असाल तर आताच सांगा, खासदारकीला तुमचे ‘काम’च करतो, असा गर्भित इशारा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना दिला. सदाशिवराव मंडलिक व मुश्रीफ यांच्या भांडणात केंद्राच्या कर्जमाफीतील ११२ कोटी परत गेल्याने जिल्ह्यातील शेतकºयांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, शेतकºयांना संपविण्याचे उद्योग बंद करावेत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
‘गोकुळ’ मल्टिस्टेटच्या समर्थनार्थ शुक्रवारी फुलेवाडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पी. एन. पाटील म्हणाले, ‘गोकुळ’ वाढला पाहिजे, देशाच्या पातळीवर पोहोचला पाहिजे, यासाठी संचालकांनी ‘मल्टिस्टेट’चा निर्णय घेतला; पण काहीजण गैरसमज पसरवत आहेत, जिल्ह्यात सहा-सात साखर कारखान्यांसह ‘वारणा’ दूध संघ मल्टिस्टेट आहे. ‘अमूल’चे रोजचे दूध १.६५ कोटी लिटर आहे, आम्ही ‘अमूल’च्या प्रगतीकडे बघतो, बंद पडलेल्या ‘महालक्ष्मी’, ‘मयूर’कडे बघत नाही. त्यामुळे चांगल्या चाललेल्या संघाबद्दल गैरसमज पसरविणे बंद करावे.’महाडिकांनाही विरोध‘आम्हाला महाडिक लागतात किंवा त्यांच्याशिवाय आमचे कांही चालत नाही’ असे कोणी समजू नये. लोकसभेच्या सन २००४ निवडणुकीत धनंजय महाडिक हे शिवसेनेतून, तर सदाशिवराव मंडलिक राष्टÑवादीतून उभे होते. त्यावेळी ‘गोकुळ’मध्ये आम्ही एकत्र होतोच. आमचे तीन-चार संचालक होतेच; पण पक्षाचा आदेश महत्त्वाचा मानून मंडलिक यांचा प्रचार केल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले.शेट्टींचे दूधही ‘गोकुळ’ला!‘गोकुळ’ विरोधातील नेत्यांचा समाचार घेताना पी. एन. पाटील म्हणाले, मल्टिस्टेटला विरोध करणारे राजू शेट्टी यांचा दूध संघही ‘मल्टिस्टेट’ आहे, त्यांचे दूध खपत नसल्याने अनेकवेळा ते ‘गोकुळ’ला दूध पाठवतात!मलईची चव अरुण नरकेंना विचारा : पी. एन.कोल्हापूर / कोपार्डे : ‘गोकुळ’ मधील मलई, लोणी कोणी किती खाल्ले? हे ४१ वर्षे संचालक असणाºया चुलत्याला (अरुण नरके) विचारा. कर्जमाफीत लाखो शेतकरी वंचित असताना सभागृहात तोंड न उघडणाºयांनी माझ्या नादाला लागू नये, मी १७ पक्षांच्या जीवावर आमदार झालेलो नाही, मी जर तोंड उघडले, तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिला. मल्टिस्टेटमुळे शेतकरी पर्यायाने ‘गोकुळ’च्या हिताला बाधा आल्यास आपण विरोधकांच्या पुढे जाऊन मल्टिस्टेटला विरोध करू, असेही पाटील यांनी सांगितले.
‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत करवीर, पन्हाळा तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींचा मेळावा शुक्रवारी फुलेवाडी येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कुंभी’चे माजी अध्यक्ष संभाजी पाटील होते.
पी. एन. म्हणाले, ‘करवीरचे आमदार केवळ थापा मारण्यात पटाईत आहेत. हद्दवाढ रद्द केली आणि भयंकर असणाºया प्राधिकरणात जनतेला ढकलण्याचे पाप केले. आपण पाच वर्षे आमदार होतो, या काळात ४२ ठिकाणी पूल उभे केले, केंद्राच्या कर्जमाफीत वंचित राहिलेल्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी तत्कालीन कॉँग्रेस मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला; पण सध्याच्या कर्जमाफीत लाखो शेतकरी वंचित राहिले आहेत, तोंड न उघडणारे आमदार मी मूग गिळून गप्प असल्याचे सांगतात. माझ्या तोंडात मूग आहे की नाही, हे बघण्याचे धाडस करू नका. तोंड उघडले, तर पळता भुई थोडी होईल.
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, ‘विरोधकांनी आतापर्यंत आमच्यावर पाच दावे दाखल केले आहेत, हिंमत असेल तर जनमताच्या बळावर हाणून पाडा, दावे कसले करता? यात कसला पुरुषार्थ आहे. मल्टिस्टेटमुळे सभासदांचा हक्क कायम राहणार आहे, उलट दूध उत्पादन वाढल्याने नफा वाढेल आणि उत्पादकांना जादा दर देता येईल.’
‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग हिर्डेकर (बाजार भोगाव), टी. एल. पाटील (खाटांगळे), बुद्धीराज पाटील (महे), भगवान लोंढे (सांगरूळ), सर्जेराव शेळके (वडकशिवाले), करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी , जयसिंग पाटील (शिये), रघू पाटील(प्रयाग चिखली) यांनी मनोगत व्यक्त केले. ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, जयश्री पाटील-चुयेकर, संभाजीराव पाटील, तुकाराम पाटील, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, ‘कुंभी’चे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या शिल्पा पाटील, पांडबा यादव, पांडुरंग पाटील, आदी उपस्थित होते. कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी आभार मानले.सतेज पाटील यांच्यावर टीका टाळली‘मल्टिस्टेट’ विरोधात पहिल्यांदा आमदार सतेज पाटील यांनी मोहीम उघडली; पण मेळाव्यात पी. एन. पाटील यांच्यासह सर्वांनीच त्यांच्यावरील टीका टाळली. त्यांचा सगळा रोख मुश्रीफ व चंद्रदीप नरके यांच्यावरच होता.राजकीय संन्यास नव्हे, तुम्ही सांगेल ती शिक्षागेले अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारणात मी वावरत आहे; पण एखाद्या संस्थेमध्ये माझ्या मुंबई दौºयाच्या जेवणाचे बिल दाखवा, राजकीय संन्यासच काय, तुम्ही सांगेल ती शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘कुंभी’ कर्जाच्या खाईत‘कुंभी’च्या शेतकºयांना एफआरपी दिली म्हणजे उपकार केले नाहीत. हे पैसे देण्यासाठी कामगारांच्या नावावर कर्जे काढले, एवढेच नव्हे, तर बैलगाड्यांवर बोगस कर्जाची उचल केल्याचा आरोपही बाळासाहेब खाडे यांनी लगावला.‘मल्टिस्टेट’ करण्याचा कायदेशीर अधिकार संस्थेला‘गोकुळ’चे सहकार न्यायालयात म्हणणे सादर : सोमवारी होणार सुनावणीकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) मल्टिस्टेटबाबत शुक्रवारी सहकार न्यायालयात म्हणणे सादर केले. मल्टिस्टेट करण्याचा कायदेशीर अधिकार संस्थेला असून, सभेच्या स्थळ व वेळेबाबत संस्थेला स्वायत्तता असल्याचे म्हणणे संघाने न्यायालयात सादर केले आहे.‘गोकुळ’ने मल्टिस्टेटचा विषय पोटनियम दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरला होणाºया सभेपुढे ठेवला आहे. त्याला विरोधी गटाच्या वतीने विठ्ठलाई दूध संस्था, सरवडे (ता. राधानगरी), हनुमान दूध संस्था, शिरोली दुमाला (ता. करवीर) व हनुमान दूध संस्था गाडेगोंडवाडी (ता. करवीर) यांनी सहकार न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत न्यायालयाने ‘गोकुळ’ अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी ‘गोकुळ’च्या वतीने अॅड. लुईस शहा यांनी म्हणणे सादर केले. मल्टिस्टेट करण्याचा अधिकार सहकारी संस्थांना कायद्याने दिला आहे, तशी तरतूदही आहे. त्याचबरोबर सभा, वेळ ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी संस्थेला असून, जर सभेत मतदान घेण्याची मागणी झाली तर ते गुप्त घ्यायचे की आवाजी याचा पूर्णपणे अधिकार हा अध्यक्षांना असतो, असे म्हणणे सादर केले आहे. पुढील सुनावणी सोमवारी आहे.
संघाला मल्टिस्टेट करण्याचा कायदेशीर अधिकार आहे, यासह विविध मुद्दे आम्ही न्यायालयात सादर केले आहे.- अॅड. लुईस शहा(‘गोकुळ’चे वकील)