कोल्हापूर : येथील प्रसिद्ध नाट्यवितरक गौरीशंकर ऊर्फ प्रफुल्ल गणपतराव महाजन (वय ७०, रा. शाहूपुरी ३ री गल्ली) यांनी शाहु मिल परिसरातील कोटीतीर्थ तलावात आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडीस आले. ते रविवारी पहाटे पासून बेपत्ता होते. त्यांच्या चपला कोटीतीर्थ तलावाच्या काठावर आढळून आल्या होत्या. अग्निशामक आणि आपत्ती विभागातील जवानांनी त्यांचा शोध घेतला असता सोमवारी त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.प्रफुल्ल महाजन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह होते. यापूर्वी ते संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य होते. नाट्यचळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा पुढाकार होता. ते नेहमी सकाळी फिरायला जात होते. गेल्या दोन-तीन महिन्यापासून ते फिरायला जात नव्हते.
रविवारी पहाटे ते कोणाला काही न सांगता घरातून बाहेर पडले. दिवसभर ते घरी न आल्याने कुटूंबियांनी शोध घेतला असता त्यांच्या चपला कोटीतीर्थ तलावाच्या काठावर आढळून आल्या. त्यानंतर अग्निशामक आणि आपत्ती विभागातील जवानांनी त्यांची शोधाशोध केली; सोमवारी त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांनी अशाप्रकारे जिवन संपविण्याचे कारण काय होते, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.
फिरायला गेलेनंतर पाय घसरुन पडलेचे नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी त्यांचा मुलगा शिरीष महाजन यांनी शाहूपुरी पोलिसांत वर्दी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.