कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेच्या निश्चित दरासह बफर स्टॉकबाबत घेतलेल्या निर्णयाने बाजारात साखरेचे दर वधारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य सहकारी बॅँकेने मूल्यांकनात सव्वाशे रुपयांची वाढ केली असून, आता प्रतिक्विंटल २७०० रुपये कारखान्यांना मिळणार आहेत.कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या दरात घसरण सुरू राहिली. हंगाम सुरू होताना प्रतिक्विंटल ३५०० रुपये घाऊक बाजारात दर होता; पण हंगाम संपताना तो २७०० रुपयांपर्यंत खाली आल्याने बॅँकांचे मूल्यांकन २,५७५ रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे कारखानदार चांगलेच हवालदिल झाले होते.
शेतकरी संघटनांबरोबर झालेल्या समझोत्यानुसार एफआरपी अधिक दोनशे रुपये दराचा निर्णय झाला होता. साखरेच्या दरात घसरण झाल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केल्याने वरील दोनशे सोडा, पण शेतकऱ्यांना केवळ एफआरपी देणे मुश्कील झाले.
वेळेत एफआरपी न दिल्याने कायद्याच्या कचाट्यात कारखानदार सापडले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला.
साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपयांच्या खाली येणार नाही, असा निर्णय केंद्राने घेतला. त्याचबरोबर बफर स्टॉक व कारखान्यांना साखर विक्रीबाबत ठरवून दिलेल्या कोट्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढत असल्याने राज्य सहकारी बॅँकेने मूल्यांकन वाढविले आहे. प्रतिक्विंटल २७०० रुपये कारखान्यांना मिळणार असून, त्यातून उसासाठी १६८० रुपये राहणार आहेत.त्याचबरोबर कारखान्यांना साखर विक्रीसाठी कोटा ठरवून दिल्याने भविष्यात बाजारात साखर कमी येऊन दर वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हेच मूल्यांकन तीन हजारांपर्यंत जाईल, असा साखर तज्ज्ञांचा अंदाज आहे.
असे राहिले साखर मूल्यांकन-महिना मूल्यांकन रुपयांतनोव्हेंबर २०१७ ३३९०डिसेंबर २०१७ ३१००जानेवारी २०१८ २९७०५ एप्रिल २०१८ २९२०१६ एप्रिल २०१८ २८००२१ एप्रिल २०१८ २७००२ मे २०१८ २५७५३० मे २०१८ २७००