कोल्हापूर : राजारामपुरीच्या आठव्या गल्लीमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वृद्धाला लुटणाऱ्या शिये (ता. करवीर) येथील तिघा लुटारूंना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व एअरगन जप्त केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.संजय प्रल्हाद गुरव (वय ५८, रा. कुपेकर गल्ली, मंगळवार पेठ) हे राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. २० जुलै रोजी दुपारी जेवण करून ते शतपावलीसाठी कार्यालयातून बाहेर चालत राजारामपुरी आठवी गल्ली येथे गेले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्यांना अडवून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली होती.
येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेही चोरटे कॅमेराबद्ध झाले होते. तिघेही २० ते २७ वयोगटातील असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शिये येथील तिघांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णन मिळतेजुळते असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्याजवळ रिव्हॉल्व्हर नव्हे तर लहान एअरगन मिळून आली.
गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. तिघेही शिये एम. आय. डी. सी. येथे खासगी कारखान्यात काम करतात. तिघांनाही दारूचे व्यसन आहे. ते सराईत नाहीत. त्यांनी लूटमारीचा पहिलाच प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.