कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण झाला असून, दावे व हरकती घेतल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी अभिकर्ते (बीएलए) यांची नियुक्ती केल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासोबत यादीमधील नावांबाबत शहानिशा, दुरुस्ती करता येईल. त्यामुळे लवकरात लवकर अभिकर्ते यांची नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील खासदार, आमदार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमुख उपस्थिती आमदार संध्यादेवी कुपेकर, कॉँग्रेसचे डी. डी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय भोसले, महावीर पाटील, भाजपचे चंद्रकांत घाटगे, आम आदमी पार्टीचे निलेश रेडेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, आदींची होती.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्ह्यात एकूण ३३२१ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये ३६ मतदान केंद्रांची भर पडली आहे. या केंद्रांसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्यासोबत राजकीय पक्षांनीही ‘बीएलए’ नेमणे अपेक्षित आहे; त्यामुळे राजकीय पक्षाच्या लोकांना काही शंका असल्यास त्याचे निरसन करताना काही अडचणी येणार नाहीत.ते पुढे म्हणाले, पुढील आठवड्यापासून प्रत्येक मतदान केंद्रांवर व गावांमधील चौक, बाजार पेठांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’ संदर्भात जनजागृती केली जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय कार्यक्रम आखण्यात आला असून, तो तीन आठवडे ते एक महिना सुरू राहणार आहे. त्यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे.उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी मतदार यादीसह निवडणूक विभागाच्या कार्यक्रमांची प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. यावेळी आ. कुपेकर, विजय भोसले, डी. डी. पाटील यांनी सूचना मांडल्या.