कोल्हापूर : कोल्हापुरकरांनी पर्यावरणपुरकरित्या कुंडात विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे इराणी खणीत पून्हा विसर्जन करण्यात आले. तर निर्माल्य एकटी संस्थेच्या वाशी येथील प्लॅन्टवर पाठवण्यात आले. या निर्माल्याचे संस्थेच्यावतीने खत बनवले जाते.भक्तांच्या घरी राहून पाच दिवस पाहूणचार घेतलेल्या गणपती बाप्पांना सोमवारी जडअंतकरणाने निरोप देण्यात आला. उत्सव जल्लोषात साजरा करताना कोल्हापुरकरांनी मात्र पर्यावरणप्रेमी, सुजाण आणि जागरुक नागरिकाचे कर्तव्य पार पाडले. पंचगंगा नदी घाट, रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कळंबा अशा जलाशयांच्या ठिकाणी जावूनही प्रत्यक्ष नदी पात्रात किंवा तलावात मूर्ती विसर्जित करण्याचा मोह नागरिकांनी टाळला. तेथेच स्वयंसेवी संस्था व महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर शंभर टक्के निर्माल्य दान झाले.
कोल्हापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापूर शहरातही राजारामपूरी, सासणे ग्राऊंड, उपनगरे, पाचगाव परिसर, विविध कॉलन्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी काहिलीेची सोय करण्यात आली होती.भागाभागातील नागरिक तेथे येवून गणेशमूर्ती विसर्जित करत होते. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत गणेश विसर्जनाचा सोहळा सुरू होता. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच महापालिकेच्या सफाई कामगारांनी पंचगंगा नदी घाटाच्या स्वच्छतेला सुरवात केली.