कोल्हापूर : धनगर समाजाने कॉँग्रेस व भाजप कडे आरक्षणाची मागणी केली, पण कोणीही न्याय दिला नाही. त्यामुळे आता या समाजाने निर्णय घेतला आहे, आलुतेदार -बलुतेदारांना एकत्र करून शाहू, फुले, आंबेडकर यांची चळवळ दृढ करून सत्ता हस्तगत करायची. सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढपूरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन केल्याची माहिती भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत दिली.धनगर समाज आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहिला आहे. कॉँग्रेस व भाजप ने त्यांना आश्वासने दिली पण त्याची अंमलबजावणी केली नाही. सत्तेवर येताच पंधरा दिवसात धनगरांना आरक्षण देण्याची घोषणा करणारे भाजपचे नेत्यांनी आता समाजबांधवांचा भावनिक छळ सुरू केला आहे.
सरकारला धडा शिकवण्याची वेळी आली असून सरकार विरोधातील आरपारची लढाई करायची आहे. व्यवस्था परिवर्तन, नवनिर्मिती व क्रांतीच्या नव्या लढाईला आता तोंड फुटले असून धनगर समाज आता मागतकर्ती नसून राज्यकर्ती होणार आहे. या लढाईची सुरूवात २० मे रोजी पंढरपूरातील निर्धार मेळाव्याने होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.समाजातील आलुतेदार-बलुतेदारांनी एकत्रीत येण्याची गरज असून या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून तसा प्रयत्न सुरू आहे. समाजामध्ये ३३ टक्के समुह आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सागिंतले.