कोल्हापूर : शिक्षणमंंत्री विनोद तावडे यांनी बिंदू चौकातील चर्चेसाठी तारीख, वेळ कळवावी. शाळा समायोजनाबाबतच्या खुल्या चर्चेचे आव्हान कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारले असल्याची माहिती शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी सोमवारी दिली.शिक्षणमंत्री तावडे हे रविवारी (दि. १३) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शाळा समायोजनाबाबत कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक पालक, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत आहेत. समायोजनाबाबत खुल्या चर्चेसाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी बिंदू चौकात यावे, असे आव्हान दिले. यावर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने सोमवारी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची भेट घेतली.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर समितीने शिक्षणमंत्री तावडे यांना खुल्या चर्चेसाठी तारीख, वेळ कळविण्याबाबतचे पत्र फॅक्सद्वारे पाठविले. मंत्री तावडे म्हणतात, कोल्हापुरात फक्त डाव्यांनीच ‘शिक्षण वाचवा’ची आवई उठविली आहे; पण, पुणे, मुंबई येथे ८५ हून अधिक संघटनांनी शाळा बंद, कंपनीकरणाविरोधात आंदोलने केली असून आजही सुरू आहेत. अनेक आमदारांनी शाळा बंद, कंपनीकरणाविरोधात आवाज उठविला. ते सर्वच डावे आहेत काय?कोल्हापुरातून सुरू झालेली शिक्षण वाचवा ही चळवळ समाजातील सर्व घटक, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी उभारली आहे. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची राजकीय, सामाजिक कारकिर्द तुमच्या वयापेक्षा दुपटीने आहे. त्यामुळे त्यांची दिशाभूल कोणी करू शकणार नाही. यापूर्वीदेखील समितीला चर्चेसाठी बोलाविले असते, तर समिती आली असती, अशी माहिती समितीचे निमंत्रक पोवार, मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली.
प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेवेळी समितीचे सुभाष देसाई, गणी आजरेकर, लाला गायकवाड, महादेव पाटील, राजाराम सुतार, चंद्रकांत यादव, वसंत मुळीक, भरत रसाळे, एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, दादा लाड, संभाजीराव जगदाळे, महेश जाधव, बाबासो देवकर, पंडितराव सडोलीकर, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, विजय सुतार, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, उमेश देसाई, राजाराम वरूटे उपस्थित होते.
शाळांच्या कंपनीकरणावर बोलत नाहीतशासनाने समायोजनाच्या नावाखाली दहा पटाच्या आतील १३१४ शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध झाला. चळवळीतील काही लोकांनी त्यातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे तो आकडा ५४७ वर आला. मग, याबाबत शासनाने का माघार घेतली? शाळा कंपनीकरणावर शिक्षणमंत्री बोलत नाहीत. स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये गोरगरिबांच्या किती मुलांना प्रवेश मिळाला. त्याची आकडेवारी शासनाने जाहीर करण्याची मागणी समितीने केली.
‘शताब्दी’साठी शासनाला सवड नाहीराजर्षी छत्रपती शाहूंनी केलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचे यंदा शताब्दी वर्ष सुरू आहे. हा शताब्दी महोत्सव साजरा करायला शासनाला सवड नाही. याबाबत जनतेला खेद वाटत असल्याचे समितीने म्हटले आहे.