कोल्हापूर : ‘प्रत्येक माणसाने जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम त्याने आपल्यातील अहंकार सोडून दिला पाहिजे,’ असा कानमंत्र बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी बुधवारी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित शिक्षक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने पालिकेच्या शाळेतील पाच, खासगी शाळेतील पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन, तर दोन शिक्षकांना विशेष शिक्षक पुरस्कार आणि दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यातील काही पुरस्कार महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, शिक्षण सभापती अशोक जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.अपघाताने कोणतीही गोष्ट घडत नसते. एखादी गोष्ट तुम्ही मनात आणली आणि त्यासाठी सतत ध्यास घेतला तरच त्यात तुम्ही यशस्वी होता. घंटा वाजविणारा शाळेचा एक विद्यार्थी अमेरिकेचा अध्यक्ष होतो, ही गोष्ट काही अपघाताने घडलेली नव्हती. त्यासाठी त्याने सातत्याने जप केला, ध्यास घेतला, सतत चिंतन केले, त्याचा पाठलाग केला; तेव्हा त्याचे स्वप्न सत्यात उतरले, असेही डॉ. पाटील म्हणाले.शिक्षण सभापती अशोक जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले, तर प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी महापौर बोंद्रे, आयुक्त चौधरी, नगरसेविका रूपाराणी निकम यांची भाषणे झाली. पुरस्कारप्राप्त शिक्षकांपैकी युवराज सरनाईक, सुप्रिया देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभास प्रा. प्रभाकर हेरवाडे, प्राचार्य आय. सी. शेख, मेहजबीन सुभेदार, श्रावण फडतारे, छाया पोवार उपस्थित होते.शोभा बोंद्रे आमदार होतीलसमारंभाच्या अध्यक्ष असलेल्या शोभा बोंद्रे यांच्याविषयी बोलताना डी. वाय. पाटील म्हणाले की, शोभा बोंद्रे महापौर झाल्या. आता त्या आमदार होतील; कारण बोंद्रे घराण्याची तशी राजकीय परंपरा आहे. कै. श्रीपतराव बोंद्रे यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. त्याचा समाजातील प्रत्येक घटकाशी स्पर्श होता. त्यांनी आपल्याला खूप मदत केली. त्यांची परंपरा आता महापौर चालवीत आहेत.मी महापौर व्हावे ही दादांची इच्छाशिक्षण सभापती अशोक जाधव यांनी आपल्या भाषणात डॉ. डी. वाय. पाटील यांचे भरभरून कौतुक केले. मी जो काही आहे, तो केवळ दादांच्या मदतीमुळेच, अशी कबुली जाधव यांनी दिली. मी महापौर व्हावे ही दादांची इच्छा आहे. दादांचा शब्द नेहमी खरा ठरतो, असेही जाधव म्हणाले. याचा संदर्भ देत डॉ. डी. वाय. पाटील यांनी अशोक जाधव यांना यावेळी महापौर होणे अशक्य आहे; मात्र ते उपमहापौर होऊ शकतात, असे सांगितले.