कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची निष्क्रियता व नाराजीच या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. ही उमेदवारांबद्दलची नाराजी दूर करायला मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस कोल्हापुरात राहावे लागते. ते नेत्यांचे पॅचअप करू शकतील; पण जनतेचे कसे करणार, असा सवाल महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे उपस्थित केला.महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत आमदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराची निष्क्रियता कोल्हापूरने पाच वर्षे अनुभवली आहे. त्यांची उमेदवारी घटक पक्षांनाच मान्य नाही. भाजपचे महेश जाधव उमेदवाराबद्दल जाहीरपणे काय बोलले हे उभ्या महाराष्ट्राने ऐकले. या नाराजीवर पॅचअप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस इथे राहावे लागतेय. त्यांनी नेत्यांचे पॅचअप जरूर केले; पण ते जनतेचे पॅचअप करू शकणार नाहीत. कोल्हापूरची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. आणि कोल्हापुरात एकदा एखादी गोष्ट जनतेनेच हातात घेतली की काय होते याचा अनुभव महाराष्ट्राला अनेकदा आला आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्याचाच प्रत्यंतर आल्याशिवाय राहणार नाही. राजा विरुध्द रयत असे स्वरुप काही लोक या निवडणुकीला देण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु अर्ज भरायला आलेली रयत पाहिल्यानंतर त्याचे वेगळे उत्तर देण्याची गरज नाही.
नेत्यांचे केले; पण जनतेचे पॅचअप कसे कराल..? - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 5:47 PM