कोल्हापूर : महावितरण कंपनीचा सरासरी २२ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्याच्या औद्योगिक, कृषी, सामाजिक विकासाच्या दृष्टीने मारक आहे. हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मंगळवारी मोर्चाने केली. दरवाढीच्या प्रस्तावाची त्यांनी महावितरण कार्यालयासमोर होळी करून निषेध व्यक्त केला. मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा कामगारांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.या आंदोलनात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक), गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा), मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगले (मॅक), इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन फौंड्रीमेन (आयआयएफ), कॉन्फिडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री या संघटना सहभागी झाल्या.
महावीर उद्यान येथे मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उद्योजक-व्यावसायिक जमले. त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. तेथून मोर्चाने उद्योजक, व्यावसायिक ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर आले. ‘प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा’, ‘सलग तीन वर्षे दर स्थिर ठेवा’, अशा घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांना निवेदन दिले. त्यांच्याशी मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यावर भोसले यांनी संबंधित मागण्या महावितरणचे वरिष्ठ कार्यालय तसेच वीज नियामक आयोगाकडे पाठविण्यात येतील असे सांगितले.या आंदोलनात वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुल आरवाडे, ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संजय शेटे, उद्यम सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक जाधव, ‘आयआयएफ’चे अध्यक्ष सुरेश चौगुले, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष गोरख माळी, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सुरजितसिंग पवार, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, सुरेंद्र जैन, कमलाकांत कुलकर्णी, श्यामसुंदर तोतला, बाबासो कोंडेकर, हरिभाई पटेल, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, श्रीनिवास कुलकर्णी, संजय नागदेव, संजय पेंडसे, आदी सहभागी झाले.