कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी एकूण १६०४ अर्जांचे वितरण, तर ११४७ अर्जांचे संकलन झाले. राजर्षी शाहू जयंतीची महाविद्यालयांना सुटी असली, तरी प्रवेश प्रक्रिया सुरू राहिल्याने अर्ज वितरण-संकलन केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी राहिली.शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेचा सोमवारी (दि. २५) प्रारंभ झाला.
कोल्हापुरात अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्र हायस्कूल अॅँड ज्युनिअर कॉलेज या केंद्रावर विद्यार्थिनींनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)दुसऱ्या मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने अर्ज वितरण आणि संकलन केंद्रांवर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वर्दळ दिसून आली. दिवसभरात एकूण १६०४ अर्जांचे वितरण झाले. त्यात कला शाखेच्या मराठी माध्यमाच्या २२९, इंग्रजी माध्यमाच्या ११, विज्ञान शाखेच्या ७६९, वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमाच्या ४१५, इंग्रजी माध्यमाच्या १८० अर्जांचा समावेश आहे.संकलित झालेले एकूण अर्ज ११४७ आहेत. त्यामध्ये विज्ञानचे ५६२, कला मराठीचे ११२, इंग्रजीचे सहा, वाणिज्य मराठीचे २८६, इंग्रजीचे १८१ अर्ज आहेत.
दरम्यान, प्रवेशपत्र विनामूल्य द्यावे. विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश शुल्क कमी करावे, या मागण्यांसाठी आॅल इंडिया स्टुडंट्स, यूथ फेडरेशनने सोमवारी आंदोलन केले होते. या फेडरेशनचे शिष्टमंडळ आणि प्रवेश प्रक्रिया समितीची संयुक्त बैठक आज, बुधवारी शहाजी महाविद्यालयात होणार आहे.