कोल्हापूर : ‘आईऽऽ कशी आहेस तू?... तुझी खूप आठवण येत गं!... घरी कधी येणार?...’ आपल्या बंदीजन असलेल्या आईला पोटच्या चिमुकल्यांनी मारलेल्या हाकेने आणि विचारलेल्या प्रश्नाने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वातावरण कमालीचे भावनिक झाले. काहींचे नयन अश्रूंनी डबडबले. एक भावनिक व जिव्हाळ्याचा प्रसंग शनिवारी ‘गळाभेट’ उपक्रमात अनुभवायला मिळाला.कळंबा मध्यवर्ती कारागृहात १८०० कैदी आहेत. त्यांपैकी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या २५० कैद्यांची मुले लहान आहेत. या कैद्यांमध्ये काही महिलाही आहेत. शिक्षा भोगताना त्यांना परिवारापासून दुरावावे लागले. मुलांना आई-बापाची ओढ असतानाही आईबाप कारागृहात असल्याने त्यांची भेट होऊ शकत नाही.
मुलांशी गप्पागोष्टी, त्यांचे बालहट्ट पुरविता येत नाहीत. या बंदीजनांच्या भावनांना उजाळा देण्यासाठी कारागृह प्रशासनाने त्यांच्या १६ वर्षांपर्यंतच्या मुलांची गळाभेट घालून देण्यासाठी शनिवारी इतिहासातील चौथ्या नावीन्यपूर्ण ‘गळाभेट’ उपक्रमाचे आयोजन केले होते.
कारागृहाच्या मोकळ्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. १४० पुरुष आणि पाच महिला बंदीजनांनी या उपक्रमासाठी नावनोंदणी केली होती. सकाळी आठ वाजल्यापासून सुमारे ४१८ मुलांना घेऊन बंदीजनांचे नातेवाईक कारागृहाबाहेर थांबून होते. सकाळी साडेदहा वाजता या गळाभेटीला प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख व सत्र न्यायाधीश एम. ए. लवेकर होते. त्यांच्या हस्ते काही बंदीजनांची आणि मुलांची भेट घालून देण्यात आली. आई किंवा वडील असो; त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेण्याची संधीही मुलांना या निमित्ताने मिळाली अन् नेहमी सुन्न असणारे कळंबा कारागृहातील वातावरण गहिवरून गेले. एक भावनिक व जिव्हाळ्याचा प्रसंग कारागृहात अनुभवायला आला. कार्यक्रमास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे, कारागृह अधिकारी एच. एस. जाधवर, एस. एल. आडे, आर. एस. जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.अधिकारी, कर्मचाºयांना गहिवरून आलेपाल्य कारागृहात गेल्यानंतर हातातील ओळखपत्र घेऊन ते आपल्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न करीत होते; तर दुसरीकडे मुलांच्या गर्दीतून बंदीजनांच्या नजरा आपल्या मुलाला शोधताना दिसत होत्या. अनेक बंदीजन आपल्या पाल्याला घट्ट मिठी मारून अश्रूंना वाट करून देत असतानाचे दृश्य पाहून कारागृह प्रशासनाधिकारी, कर्मचाºयांनाही गहिवरून आले.
कैद्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चात्ताप व्हावा, त्यांच्यात सुधारण्याची इच्छा जागृत व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.- शरद शेळके :कारागृह अधीक्षक