कोल्हापूर : दैनंदिन जीवनात मनुष्य कचऱ्याच्या बाबतीत एक चुक करतो. परंतु त्या हजार पटीने वाढतात. याच चुका पशु - पक्षी आणि संपूर्ण मानव जातीवर विपरीत परिणाम करतात. पर्यावरणाची अपरिमित हानी तर होतेच शिवाय जीवसृष्टीची सुध्दा हानी होते. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीनिवासन यांनी बुधवारी येथे केले.घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ इंडियन तसेच ग्रीन सर्व्हिसेसचे (वेल्लोर, तमिळनाडू)या संस्थेचे श्रीनिवास यांची दोन दिवसीय मोफत कार्यशाळा येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करीत होते.
महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. गुरुवारीही कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.
माणसाकडून निर्माण होणारा कचरा हा पशु - पक्षी यांच्यासह शेवटी माणसांच्या जगण्यावरच कसा परिणाम करीत आहे याचे गांभीर्य श्रीनिवास यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवून दिले. घनकचऱ्याचे योग्यरित्या विघटन झाले नाही तर कचऱ्याच्या ढीगातून निर्माण होणारा मिथेन वायू माणसाला खायला उठतो.
उघड्यावर, मोकळ्या विहिरीत कचरा टाकल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत खराब होतात. त्या परिसरातील केवळ मातीच नाही तर हवा, पाणी सुध्दा प्रदुषित होते. त्याचा परिणाम थेट मानुष्य जीवनावर हातो, असे श्रीनिवास यांनी सांगितले.कचऱ्यातून आलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या जनावरांच्या जीवनावर कशा उठतात हेदेखिल चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले. जनावरे कचऱ्यासह प्लॅस्टीक खातात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो.
जयपूरमध्ये मृत झालेल्या अनेक गायींचे शवविश्चेदन करण्यात आले त्यावेळी त्याच्या पोटात १० किलोपासून ५० किलोपर्यंत प्लॅस्टीकच्या पिशव्या आढळून आल्या. माणसाची एक चुक अशा किती मुक्या जनावरांचा जीव घेत असतील याचा विचार नागरीकांनी केला पाहिजे, असे श्रीनिवास म्हणाले.घरातील कचरा थेट रस्त्यावर न टाकता नागरीकांनी कचऱ्याचे विलगीकरण घरातूनच करुन दिले पाहिजे, अन्यथा हाच कचरा एक दिवस आपल्याच जीवावर उठणार आहे. त्यामुळे नागरीकांनी या विषयाकडे गांभीर्यान पाहण्याची आवश्यकता आह, असेही ते म्हणाले.उद्घाटक या नात्याने मार्गदर्शन करताना महापौर यवलुजे यांनी आपले शहर स्वच्छ ठेवण्याची तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही याची जबाबदारी ही प्रत्येक नागरीकांची आहे. नागरीकांनी सरकारी योजनांची माहिती करुन घेऊन त्याच्या अंमलबजावणीत योगदान दिले पाहिजे असे सांगितले.उद्घाटन समारंभास उपमहापौर सुनिल पाटील, स्थायी सभापती संदीप नेजदार, स्वच्छ शहरचे ब्रॅँड अम्बेसिडर डॉ. मधुकर बाचुळकर, प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे, नगरसेविका उमा इंगळे, रुपाराणी निकम, सूरमंजरी लाटकर, भाग्यश्री शेटके, नगरसेवक भुपाल शेटे, सुचन पाटील, अफजल पिरजादे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील नागरीक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.