कोल्हापूर : भारतामधील लोकसंख्येचा असमतोल यापुढे अनेक प्रश्नांना जन्म घालणारा ठरणार असल्याने याबाबतीत समान धोरण राबविण्याची मागणी ‘राष्ट्र निर्माण’ संघटनेच्यावतीने अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी पत्रकार परिषदेत केली.हा विषय ऐरणीवर यावा यासाठी देशभर ‘भारत बचाओ, महारथ यात्रा’ काढण्यात आली असून २२ एप्रिल २०१७ रोजी दिल्लीत १० कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी कर्नल यू. बी. सिंह, यात्रा संयोजक मेजर जनरल एस. पी. सिन्हा, कर्नल टीपीएस त्यागी, मधुकर नाझरे उपस्थित होते.चव्हाणके म्हणाले, चीनलाही आपण मागे टाकू इतका भारताचा लोकसंख्या वाढीचा वेग आहे. त्यामुळे ‘हम दो, हमारे दो, सबके दो’ या धोरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे. ३२ खासदार, २०० आमदार, ५० हून अधिक मंत्री आणि ६ केंद्रीय मंत्र्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.तिसरे अपत्य झाल्यास मतदानाचा अधिकार काढून घेणे, शासकीय सवलती बंद करणे, नागरिकत्व रद्द करणे यासारखे कठोर उपाय योजल्याशिवाय भारताच्या लोकसंख्येतील समतोल राहणार नाही, असे चव्हाणके म्हणाले.