कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील राधानगरी प्रांताधिकारी कार्यालयाच्या हॉलमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. ईव्हीएमबाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.राधानगरी प्रांताधिकारी कार्यालयाच्या हॉलमध्ये ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशिक्षक पुरुषोत्तम ठाकूर यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण करून उपस्थितांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.