कोल्हापूर : न्युरो नेव्हीगेशन मशीन प्रणालीच्या सुविधेमुळे आता मेंदूतील गाठीच्या आजाराचे नेमके ठिकाण, निदान कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटरमध्ये समजणार आहे. ही सुविधा रूग्णांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे.या हॉस्पिटलमध्ये ‘संस्कार’(सिद्धगिरी अँडव्हान्सड न्युरो सायन्स सेंटर अँन्ड रिसर्च युनिट) हा विभाग कार्यरत आहे. त्यामध्ये ‘न्युरो नेव्हीगेशन सिस्टीम’ सुविधा उपलब्ध होणार आहे. न्युरो नेव्हीगेशन मशीन प्रणाली देशातील सुमारे दोनशे ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
या प्रणालीची किंमत एक कोटी रूपयांहून अधिक आहे. सर्वसामान्य लोकांसाठी या सुविधेचा वापर मोठा खर्चिक आहे. मात्र, पश्चिम भारतामध्ये प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी आता ‘न्युरो नेव्हीगेशन’ प्रणाली उपलब्ध होत आहे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रामुख्याने या सुविधेचा उपयोग होणार आहे.
न्युरो नेव्हीगेशन तंत्रज्ञान हे आजाराचे नेमके ठिकाण आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी नेमकी दिशा आणि ठिकाण दर्शवते. शस्त्रक्रियेसाठी योग्य दिशेने जाण्यास मार्गदर्शन करते. थोडक्यात जीपीएस तंत्रज्ञानाप्रमाणे त्याचे काम चालते. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळेची बचत होते.
कवटीच्या हाडाचेही ज्यादाचे घ्यावे लागणारे छेद सुद्धा कमी प्रमाणात घेण्यास मदत होणार आहे. शस्त्रक्रिया करताना मेंदूच्या आजूबाजूला असणारा भागसुद्धा दर्शवित असल्याने मेंदूमध्ये अतिरिक्त होणारी इजा थांबू शकते.त्यामुळे मेंदूमध्ये कमीतकमी छेद घेवून कमी वेळेत आता मोठ मोठे ट्युमर सुद्धा पूर्णपणे सहज काढणे शक्य होणार आहे. यशस्वी शस्त्रक्रियेचा स्तर उंचावणार आहे.
यासाठी होणार उपयोगया न्युरो नेव्हीगेशन मशीन प्रणाली प्रामुख्याने मेंदूच्या आणि मणक्यातील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामध्ये कवटी संदर्भातील शस्त्रक्रिया,लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, त्याचबरोबर मेंदू व मणक्यातील ट्युमरच्या शस्त्रक्रिया, व्ही.पी.शंट, बायोप्सी आणि सर्व प्रकारच्या व्हस्क्युलर सर्जरी, जसे की ब्रेन अँन्यूरीजम, ई.व्ही.एम. सार आजाराच्या उपचारासाठी उपयोग होणार आहे.
इतर ठिकाणचा विचार करता इतके महागडे तंत्रज्ञान ताशी भाडेतत्वावर वापरली जाते. मात्र, हे तंत्रज्ञान सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये मोफत उपलब्ध होणार आहे. या सुविधेचे लोकार्पण गुरूवारी (दि. २५) सकाळी सव्वा दहा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार असल्याचे सिद्धगिरी हॉस्पिटलचे मेंदू सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी सांगितले.