कोल्हापूर : शेंडा पार्क परिसरातील कृषी संशोधन केंद्राच्या विस्तीर्ण जागेतील वृक्षांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. या परिसरातील सुमारे २५0 हून अधिक झाडांची खुलेआम कत्तल झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एका बाजूला सरकार ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी मोहीम दरवर्षी राबवित असतानाच शासकीय जागेतच झालेल्या या विनापरवाना तोडीमुळे सरकारच्या योजनेलाच हरताळ फासला आहे.शासनाच्या वतीने प्रत्येकवर्षी जुलैच्या दरम्यान शतकोटी वृक्ष लागवड योजना राज्यभर राबविली जाते. शासकीय पड जमिनीवर मोठ्या संख्येने वृक्षारोपन केले जाते. योजनेच्या माध्यमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि परिसर प्रदूषणमुक्त ठेवा’ हा संदेश दिला जात आहे. यात सर्व सरकारी कार्यालयांचा सहभाग असतोच. यंदाच्यावर्षी या मोहिमेत कृषी संशोधन केंद्रानेही सहभाग नोंदविला आहे.कृषी संशोधन केंद्राची शेंडापार्क परिसरात सुमारे १५१ हेक्टर अशी विस्तीर्ण जमीन आहे. येथे विविध पिके घेऊन, त्यावर संशोधन प्रक्रिया राबविली जाते. संशोधन केंद्राच्या जागेत विविध प्रकारचे, तसेच जंगली वृक्ष मोठ्या संख्येने डोलाने उभारले आहेत. याशिवाय खुरटे, दाट झुडूपही मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या महिनाभरात या शासकीय जागेतील वृक्षांची बेसुमार तोड करण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे.
कटर मशीनच्या साहाय्याने काही मिनिटातच अनेक मोठमोठी झाडे जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. पोकलॅन, जेसीबी मशीनचाही यासाठी वापर केला जात आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींतून तीव्र नाराजीची लाट उमटत आहे.
खुल्या जागेतीलही वृक्षतोडजमिनीभोवती सुरक्षेसाठी चर खोदण्याचे काम सुरू आहे, हे निमित्त पुढे करून या शासकीय जागेतील वृक्षांची कत्तल केली जात आहे. चर खोदताना आडव्या येणाऱ्या वृक्षांसह खुल्या जागेतीलही वृक्षांची मोठ्या संख्येने तोड झाल्याने पर्यावरणप्रेमींतून संतापाची लाट उमटत आहे.
शिवाय येथे सुरक्षा भिंत उभारण्यासाठी अद्याप शासकीय निधी मंजूर नसताना, हा नाहक खर्च केला जात आहे. हे खोदलेले चर पावसाळ्यात पुन्हा मुजण्याची शक्यता असल्याने हा उठाठेव कशासाठी? असाही प्रश्न पर्यावरणप्रेमींतून विचारला जात आहे.
कृषी संशोधन केंद्राच्या शासकीय जमिनीला सुरक्षा भिंत नसल्याने पिके, फळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. पिकांच्या सुरक्षेसाठी चर खोदण्याचे काम सुरू आहे, भविष्यात येथे भिंत बांधण्यात येणार आहे. चर खोदताना काही आडवे येणारे झुडूप काढले आहेत. येथील काही जमीन पिकाऊ करण्याचेही काम सुरू आहे.- डॉ. जी. जी. खोत, सहयोगी संचालक, कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर
खासगी अथवा कोणत्याही शासकीय जमिनीतील झाडे तोडताना वृक्षसंवर्धन समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे, कृषी संशोधन केंद्राने झाडे तोडण्यासाठी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही.- उदय गायकवाड,सदस्य, वृक्षसंवर्धन समिती, कोल्हापूर