कोल्हापूर : कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोंथिंबिरीची पेंढी २५ ते ३० रुपये झाली आहे. दुसरीकडे कोबी, ओली भुईमूग शेंग, बीट यांची आवक मात्र वाढली आहे.
गेल्या आठवड्यात वळवाचा पाऊस आला असला तरी भाजीपाल्यावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. काही प्रमाणात त्यांचे दर स्थिर होते. कोल्हापूरच्या बाजारपेठेत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांबाहेरून सर्व पालेभाज्या, फळभाज्यांची आवक नियमित सुरू असून त्यामध्ये ओली भुईमूग शेंग, रताळी, मुळा, बीट, तोंदली यांची आवक आठवडी बाजारात वाढली आहे. हिरव्या वाटाण्याची आवक मात्र पूर्णपणे बंद झाली. कोथींबिरीची पेंढी २० ते २५ रुपये झाली आहे.विशेष म्हणजे या आठवड्यात कोबीची आवक भरपूर आल्याने दहा रुपयांना एक गड्डा मिळत होता. फ्लॉवरही जवळपास तितक्याच किमतीला मिळत होता तर मेथीची पेंढी १५ रुपये स्थिर आहे. पालक, पोकळा व शेपू पेंढी १२ रुपयांपर्यंत होती. कारली, दोडका, भेंडी, गवार २५ रुपये होती. गेल्या आठवड्यापेक्षा मोसंबीचा दर कमी झाला. द्राक्षे, अननस व कलिंगडचा दर या आठवड्यात स्थिर होता. पावसाच्या वातावरणामुळे लिंबू दहा रुपयांना चार होते. आल्याची आवक कमी असल्यामुळे आले मात्र १०० रुपये किलोच आहे.
डाळींचे दर स्थिरअधिक महिना सुरू झाल्याने लग्नसराई संपल्याने डाळींची मागणी जरी कमी असली तरी गेल्या आठवड्याप्रमाणेच डाळींचे दर स्थिर असल्याचे व्यापारी दत्ता साळवी यांनी सांगितले. त्यामध्ये तूरडाळ ७० रु., मूगडाळ ७५, उडीदडाळ ६५, हरभरा डाळ ५४ रु., मसूर डाळ ६० रु, चवळी ८० ते १०० रु. आहे.
फळांची आवक कमी; दर वाढले...सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, अन्य फळांची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे फळ विक्रेते संजय कोळी यांनी सांगितले. त्यामध्ये मद्रास, कर्नाटक आंब्याचा दर १०० ते १२५ रुपये डझनाचा दर आहे. रत्नागिरी हापूस आंबा २५० पुढे आहे. सफरचंदचा दर २१० रु. किलो आहे. चिक्कूचा दर ८० रु. १०० किलो दर आहे. मोसंबीचा दर १२० ते १३० आहे. पेरूचा दर ६० ते १०० रु. आहे. डाळिंबांचा दर १२० किलो आहे.