कोल्हापूर : भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा : अभय छाजेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:31 PM2018-12-20T14:31:28+5:302018-12-20T14:34:18+5:30
भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत राज्य व देश भकास केला आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूरचे प्रभारी अभय छाजेड यांनी केले.
कोल्हापूर : भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत राज्य व देश भकास केला आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूरचे प्रभारी अभय छाजेड यांनी केले.
कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनसंघर्ष अभियान व संघटनात्मक बांधणीसाठी छाजेड बुधवारी कोल्हापूर दौºयावर आले होते. काँग्रेस कमिटीत आयोजित पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील होते.
छाजेड म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, समाजातील एकही घटक समाधानी नाही. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. जीएसटीचा बेसीक स्लॅब १८ टक्के करावा, यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आग्रही होते. गेली साडेचार वर्षे या सरकारला ते समजले नाही; पण आता उशिरा शहाणपण सुचले आहे.
पाच राज्यांच्या निकालावरून भाजपचे जनमत ओसरू लागले असून, कॉँग्रेसचा जनाधार वाढत आहे. भाजप सरकारचे अपयश व कॉँग्रेस सरकारने १0-१५ वर्षांत केलेली कामे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कॉँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘शक्ती अॅप’ला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरातही चांगले काम झाले असून, या अॅपच्या माध्यमातून थेट राहुल गांधी यांच्याशी संवाद करता येणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले.
पी. एन. पाटील म्हणाले, पाच राज्यांतील निकालाने कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले असून, जनसंपर्क अभियान व शक्ती अॅपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच झोकून देऊन काम करा. स्वागत व प्रास्ताविक प्रदेश चिटणीस प्रकाश सातपुते यांनी केले. प्रदेश सरचिटणीस यशवंत हप्पे यांनी मनोगत व्यक्त केले.
महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे यांनी आभार मानले. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अॅड. सुरेश कुराडे, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, सरलाताई पाटील, ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, सुलोचना नाईकवडे, जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, बजरंग पाटील, आदी उपस्थित होते.
राहुल गांधींच्या अभिनंदनाचा ठराव
कॉँग्रेस अध्यक्ष पद स्वीकारून वर्ष झाल्याबद्दल व तीन राज्यांत कॉँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन केल्याबद्दल बुधवारच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.