कोल्हापूर : आरोग्य विभागामुळे जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्याचा ‘लुक’ बदलला आहे. विविध योजनांचे लावण्यात आलेले फलक, त्यांवर आकर्षक प्रकाशझोत आणि तयार करण्यात आलेल्या माहिती कक्षामुळे हा मजला लक्षवेधी ठरला आहे. लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
गरोदर महिलेपासून ते अत्यवस्थ असणाºया रुग्णांपर्यंत अनेकांना लाभ देण्यासाठी सरकारने विविध आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दुसºया मजल्यावर कार्यरत आहे.
या मजल्यावर गेल्यानंतर समोरच नागरिकांना दृष्टीस पडेल असा एक आकर्षक कक्ष तयार करण्यात आला आहे. स्तनपानाचे महत्त्व, १०८ रुग्णवाहिका, डॉक्टरांचा सल्ला, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष यांबाबत मार्गदर्शन करणारे फलक आणि संदेश देणाºया महिला, बाळांचे कटआउट्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. तसेच येथे आता विविध संदेश फलकही लावण्यात येणार आहे. रंगीत कटआउट्समुळे हा कक्ष अधिकच आकर्षक झाला आहे.
या मजल्यावरील पॅसेजमध्येही आरोग्य विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत. यावर आकर्षक असे प्रकाशझोत टाकण्यात आले आहेत. अशा प्रभावी पद्धतीने आरोग्य विभागाने संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील,आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी, डॉ. उषादेवी कुंभार, विस्तार अधिकारी एकनाथ जोशी यांनी ही संकल्पना राबविली.कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागाने आकर्षक माहिती कक्ष उभारला आहे. शासकीय योजनांचे आकर्षक फलकही लावण्यात आले आहेत.