कोल्हापूर : हरभरा व तूरडाळीच्या दरांत कमालीची घसरण सुरू असून, किरकोळ बाजारात तूरडाळ ६०, तर हरभराडाळ ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्याची मागणी वाढल्याने गत आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी वाढ झाली असून, हापूस आंबा, कलिंगडांच्या आवकेतही वाढ झाली आहे. सुट्यांमुळे हापूसची मागणीही चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून भाज्यांची आवक काही प्रमाणात मंदावली आहे. दरात थोडी वाढ झाली असून वांगी, कारली, गवार, भेंडी, दोडका या प्रमुख भाज्यांच्या दरात प्रतिकिलो पाच ते सात रुपयांची वाढ दिसत आहे. टोमॅटोच्या दरात या आठवड्यात थोडी सुधारणा झाली असून, सरासरी सहा रुपये प्रतिकिलो दर राहिला आहे. कोथिंबिरीची मागणी वाढली असून किरकोळ बाजारात २० रुपये पेंढी असा दर राहिला आहे. मेथी दहा रुपये, पालक पाच रुपये, तर पोकळा चार रुपये पेंढी आहे.दुसरीकडे, फळांचे दर स्थिर आहेत. मात्र, कोकणसह मद्रास हापूस आंब्यांची आवक वाढली आहे; पण उन्हाळी सुटीमुळे मागणीही वाढत असून, त्यामुळे दरात फारशी चढउतार दिसत नाही. शहरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठ, कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी पानलाईन, शाहूपुरी रेल्वे फाटक, आदी ठिकाणच्या आंब्याच्या हातगाड्यांवर ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
याचबरोबर बाजारात मद्रास हापूस, पायरी आंब्याला मागणी वाढली आहे. आंबा हापूस बॉक्सचा दर ३५० रुपयांच्या घरात गेला आहे. रायवळ ११५ रुपये, मद्रास हापूस ३०० रुपये बॉक्स, तर पायरी १६० रुपयांजवळ आहे.याचबरोबर सध्या चटणीचा हंगाम सुरू असल्याने त्यासाठी लागणारे सुके खोबरे (वाळलेले) याच्या दरात वाढ झाली आहे. ते २०० रुपयांवरून ते २२० रुपये प्रतिकिलो झाले आहे. नारळाच्या दरात वाढ होऊन तो २५ रुपये प्रतिनग झाला आहे. कलिंगडे २० रुपयांपासून ते ५० रुपये, अननस २५ ते ३० रुपये, तर द्राक्षे ४० रुपयांच्या घरात होते.
बटाटा, लसूण स्थिर; कांद्यात किंचित वाढगेल्या आठवड्यात असलेल्या कांद्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. दहा किलोंचा दर ८० रुपये झाला आहे; पण लसूण व बटाटा २० रुपये प्रतिकिलो असून यांचा दर स्थिर आहे.